कल्याणमध्ये फुगे विक्रेत्याची चिमुकली हरवली, पादचाऱ्याच्या सतर्कतेमुळे तीन तासात सापडली
कल्याण: कल्याण येथील पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील रामबाग भागात एका फुगे विक्रेती महिलेची तीन वर्षाची मुलगी खेळताना रात्री नऊ वाजता हरवली. पोलीस, पादचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तीन तासाच्या शोधानंतर रामबाग भागात या मुलीचे पालक आढळून आले.
आई, वडिलांना पाहताच रडून हैराण झालेली मुलगी काही क्षणात शांत झाली. पोलीस ठाण्यात मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील मॅक्सी ग्राऊंड भागात एक दाम्पत्य लहान मुलांसाठी खेळण्याचे फुगे विक्रीचा व्यवसाय करते. सकाळ, संध्याकाळ ते हा व्यवसाय करतात. त्यांची मुलगी त्यांच्या सोबत या भागात खेळत असते. गुरुवारी रात्री फुगे विक्रेत्यांची मुलगी आई, वडिलांची नजर चुकवून खेळत, फिरत रात्री नऊ वाजता मुरबाड रस्त्यावर पोहचली. अनोळखी रस्त्यावर आणि आई, बाबा दिसत नसल्याने मुलगी घाबरुन ओक्साबोक्सी रडू लागली. रामबाग भागात राहणारे ओमकार खत्री आणि त्यांचा मित्र भोजन झाल्यानंतर मुरबाड रस्त्यावर शतपावली करत होते. त्यांना एक लहान मुलगी रस्त्याने रडत एकटीच चालली असल्याचे दिसले.
ओमकारने मुलीला कडेवर घेऊन आजुबाजुच्या वस्तीत, फेरीवाल्यांना ही मुलगी कोणाची म्हणून विचारणा केली. मुलीची ओळख देण्यास कोणी तयार होत नव्हते. मुलीने रडून थैमान घातले होते. ही मुलगी हरवली असल्याचे लक्षात आल्यावर ओमकार व त्याच्या मित्राने तिला महात्मा फुले पोलीस ठाण्यात आले. मुलगी रडण्याचे थांबत नसल्याने ओमकारने पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तिने मुलीला खाऊ देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. तिचे रडणे थांबत नव्हते.
महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी या मुलीच्या पालकांना शोधण्यासाठी सहकारी पोलिसांना आदेश दिले. हरवलेल्या मुलीची छबी समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आली. पोलिस कल्याण मधील विविध रस्त्यांवर फिरुन फेरीवाले, फिरस्त्यांना संपर्क करुन कोणाची लहान मुलगी हरवली आहे का म्हणून विचारणा करत होते. याचवेळी या मुलीचे आई, वडील रामबाग भागातील विविध रस्त्यांवर मुलीचा शोध घेत होते. तीन तास उटलूनही मुलीचे पालक सापडत नसल्याने पोलीस हैराण होते.
रामबाग भागात फिरत असताना पोलिसांना या मुलीच्या आई, वडिलांची गाठ पडली. त्यांनी आमची मुलगी हरवली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना तात्काळ पोलीस वाहनात बसून पोलीस ठाण्यात आणले. हरवलेल्या मुलीला पाहताच पालकांना आनंद झाला. आई वडिलांना पाहताच हरवलेली रोशनी काही क्षणात रडण्याची थांबली. चिमुकलीला तिचे आई, वडील भेटल्याने पादचारी ओमकार खत्री, त्यांची पत्नी, मित्र यांनी समाधान व्यक्त केले.