सामान्य माणसे मतदानातून जोडे मारतील : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई:उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तिखट शब्दात उत्तर दिले. बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच; पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही.
आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती आमची वृत्तीच नाही. आम्हाला या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. सामान्य माणसे तुम्हाला मतदानातून जोडे मारतील, असा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.
स्वार्थाच्या कॅमेर्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात. हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, असे ते म्हणाले.