कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकरी आत्महत्या सुरूच
सोयगाव:कृषीमंत्री पद असलेल्या सोयगाव तालुक्यात जानेवारीपासून (२०२३) आजपर्यंत तब्बल चार शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. शेती मालाला भाव नाही, नापिकी अन् नैसर्गिक संकटात झालेले शेतीचे नुकसान पाहून कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे कारण महसूल दरबारी नोंदविले गेले आहे.तालुक्याला राज्याचे कृषीमंत्री पद मिळालेले आहे. तरीही, तालुक्यात आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढती झाली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी शहरात झालेल्या शेतकरी आत्महत्येची घटना ताजी असताना यापूर्वीही तब्बल मार्च अखेरीपर्यंत तीन शेतकऱ्यांनी कर्जाच्या नैराश्याने कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. एकूणच तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढते झाले असून, याला जबाबदार काही अंशी तालुका प्रशासन असल्याचे बोलले जात आहे.
दोन वर्षात २५ जणांच्या आत्महत्या
दोन वर्षात तालुक्यात तब्बल २५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीमुळे मृत्यूला कवटाळले असल्याची नोंद शासन दरबारी आहे. पैकी १८ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदत मिळाली असून, तीन आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या संचिका दोन वर्षांपासून त्रूटीमध्ये आहे. तर, चार आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या संचिका मंजुरीच्या मार्गावर आहेत.