जिल्ह्याचा उल्लेख धाराशिव नाही, तर उस्माबादच करा; न्यायालयाचा आदेश !
धाराशिव:छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहरांचं नामकरण मागील काळात झाले. राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्राने हिरवा कंदील दाखवला होता. मात्र आता पुन्हा एकदा न्यायालयाकडून धाराशिव या नावाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे.
धाराशिव असे नामकरण करण्यात आले. मात्र जिल्हा आणि तालुक्याचे नामकरणाची प्रक्रिया सुरूच असल्याने जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव न वापरता तो जुन्या नावाने म्हणजे उस्मानाबाद(Osmanabad District) असंच वापरा, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.
आता याप्रकरणी पुढील सुनावणी ६ जून रोजी होणार आहे. १० जून पर्यंत उस्मानाबाद नाव वापरण्याबाबत न्यायालयाने सुचना केल्या आहेत. धाराशिव हे जिल्ह्याचे व तालुक्याचे नवीन नाव शासकीय कामकाजात, तसेच इतर कामकाजासाठीही वापरण्यात येऊ नये.
शासनाच्या महसूल व जिल्हा परिषद(ZP) विभाग यांच्याकडून जिल्ह्याचे व तालुक्याचे नव्या नावाचा वापर केला होता. धाराशिव अशा नावाचा उल्लेख त्यांनी केला होता. त्याबाबत आजच्या न्यायालयीन सुनावणीत पुरावे व प्रशासकीय पत्रव्यवहार सादर करण्यात आले. या सर्व बाबींची पाहणी केल्यानंतर न्यायालयाने आदेश दिले आहेत.
संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचे व उस्मानाबाद तालुका नाव बदलण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आतापर्यंत केवळ उस्मानाबाद शहराचं नाव बदलण्यात आल्यामुळे ते संपूर्ण जिल्हा आणि तालुक्यासाठी सद्या तरी हे नाव वापरता येणार नाही, ते उस्मानाबादच वापरावे, असे न्यायालयाने आदेश दिले आहे. याचिकाकर्ते यांचे वकील ॲड प्रज्ञा सतीश तळेकर यांनी ही माहिती दिली आहे.