अमित शहांना वेळ नव्हता म्हणून कार्यक्रम रखरखत्या उन्हात घेतला का?
खारघर : दासबोधाचे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाची परंपरा महान आहे, मात्र चुकीची वेळ आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळय़ासारख्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.
निरपराध जीव गेले हे फार दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गोव्याला जायचे असल्याने वेळ नव्हता. म्हणून हा कार्यक्रम भरदुपारी रखरखत्या उन्हात घेतला असेल तर ही बाब फारच गंभीर आहे, असा संताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
खारघर येथील सेंट्रल पार्कच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळय़ासाठी उपस्थित असलेल्या तीनशेहून अधिक श्री सदस्यांना उष्माघाताचा तडाखा बसला. त्यांना तातडीने कामोठे येथील एमजीएम, वाशी महापालिका रुग्णालय आणि पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महाविकास आघाडीच्या नागपूर येथील वज्रमूठ सभेसाठी गेलेले उद्धव ठाकरे तातडीने मुंबईत परतले आणि त्यांनी विमानतळावरूनच रात्री साडेबारा वाजता थेट कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांशी चर्चा करून माहिती घेतली व श्री सदस्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये अशा सूचना केल्या. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी आमदार बाळाराम पाटील आदी उपस्थित होते.
…तर चौकशी कोण कोणाची करणार?
महाराष्ट्र भूषण हा राज्यातील सर्वश्रेष्ठ सन्मान आहे. धर्माधिकारी कुटुंबाच्या घराण्याची एक महान परंपरा आहे. त्यामुळे हा पुरस्कार आप्पासाहेबांना देण्यात आला याचा आनंदच होता, परंतु खारघरमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळय़ाची वेळ कोणी दिली, कशी दिली याची चौकशी होणे गरजे आहे. निरपराध जीव गेले. त्यामुळे एका चांगल्या सोहळय़ाला दुःखाची झालर लागली आहे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गोव्याला जायचे होते. त्यांच्या सोयीसाठी हा कार्यक्रम दुपारी घेतला होता अशी माहिती पुढे आली आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच अमित शहांना गोव्याला जायचे होते म्हणून कार्यक्रम भरदुपारी घेतला तर कोण कोणाची चौकशी करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.