महिलांना साड्या, मुला-मुलींना कपडे, किराणा मालाचे किट वाटत साजरी केली भीमजयंती
किरकटवाडी : डीजे सिस्टीम, मिरवणूक किंवा इतर कोणताही खर्च न करता खडकवासला येथील समता तरुण मंडळाने अनोख्या पद्धतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली आहे.
खडकवासला येथील आदिवासी कातकरी वस्तीवरील महिलांना साड्या, मुला-मुलींना कपडे, वह्या, पेन्सिल व दप्तर आणि महिनाभर पुरेल अशा किराणा मालाचे किट भेट देऊन विचारांची भिमजयंती साजरी केली आहे.
खडकवासला येथील बाह्यवळण रस्त्याला लागून अनेक वर्षांपासून आदिवासी कातकरी समाजाची वस्ती आहे. सात कुटुंबांचे वास्तव्य असलेली ही वस्ती अत्यंत मागासलेली आहे. मोडकळीस आलेल्या कुडाच्या झोपड्या, आजूबाजूने वाहणारे गटाराचे पाणी, फाटलेले कपडे , मोडकेतोडके भांडे अशा परिस्थितीत हा समाज या ठिकाणी राहत आहे.
खडकवासला येथील समता तरुण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इतर सर्व खर्च टाळून या आदिवासी कातकरी कुटुंबांना मदत करण्याचे ठरवले व त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अशोक शेळके, हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे , सौरभ मते, नरेंद्र हगवणे, रमेश करंजावणे, शांताराम मते, आनंद मते यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.
यावेळी समता तरुण मंडळाचे शुभम कांबळे, कुणाल सरवदे,गौतम कांबळे,सचिन रणधीर, अजय रणधीर, अक्षय मते,अनिल मते, प्रदीप चव्हाण, बापू मशाळे,संकेत कांबळे,आकाश कांबळे,निलेश रणधीर, भास्कर कांबळे, प्रणय कांबळे आदी उपस्थित होते.
“मंडळातील सर्वांनी मिळून भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची खऱ्या अर्थाने विचारांची भिमजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. आदिवासी कातकरी कुटुंबांना केलेली मदत हेच आमचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आहे.
संविधानाने या आदिवासींनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही तात्पुरती मदत केली आहे परंतु यांच्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.”
कुणाल सरवदे, समता तरुण मंडळ, खडकवासला.
“समता तरुण मंडळाने राबवलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून याचे अनुकरण इतर सर्व मंडळांनी करणे आवश्यक आहे. इतर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्तही असेच समाजोपयोगी कार्यक्रम व्हायला हवेत.”
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !