डोंबिवलीत बिबट्याची कातडी विकणारे धुळ्यातील दोन जण अटक
डोबिवली: बिबट्याची शिकार करुन त्याची कातडी डोंबिवलीत विकण्यासाठी आलेल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील दोन जणांना रामनगर पोलिसांनी सोमवारी रात्री शिताफीने अटक केली. त्यांनी ही कातडी डोंबिवलीतील ठाकुर्ली भागात कोणाला विकण्यासाठी आणली होती याचा तपास पोलीस करत आहेत.
जयंतीलाल साळी, दिनेश जागरे अशी अटक इसमांची नावे आहेत. ते धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर दोन इसम बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या भागात सोमवारी रात्री सापळा लावला होता.
रात्री १० दहा वाजता दोन इसम हातात दोन पिशव्या घेऊन ९० फुटी रस्त्यावर फिरू लागले. साध्या वेशातील पोलिसांना त्यांचा संशय आला. एका पोलिसाने त्यांना येथे कशासाठी आला आहात, अशी विचारणा करताच ते उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळण्याचा प्रयत्न करू लागले. तात्काळ पोलिसांनी या दोघांना घेरले. त्यांची चौकशी करताच त्यांच्या पिशव्यांमध्ये बिबट्याची कातडी आढळून आली. रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !