आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा
राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, हवामान विभागान दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज (13 एप्रिल) राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर 13 ते 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत देखील आज काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यरात्रीत मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं काही ठिकाणी झाडांची पडझड देखील झाली आहे. तर काही ठिकामी घरावरील पत्रे देखील उडून गेले आहेत.
शेती पिकांना मोठा फटका
सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान झालं आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळं जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाला मोठा फटका
गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपीट सुरु आहे. यामुळं जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, दिंडोरी अशा 11 तालुक्यातील गावात अक्षरशः थैमान घातलं आहे. या भागातील जवळ-जवळ 145 गावातील 8468 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळं शेतकऱ्यांना अश्रूही अनावर झाले आहेत. आभाळचं फाटलं तिथं ठिगळं कुठं लावायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अवकाळी पावसामुळं नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे 5814 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. डाळिंबाचे 773 हेक्टर, द्राक्षबागा 755 हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. इतर शेतीपिकं जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीमुळं नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !