पंढरपूर वारीचं वेळापत्रक जाहीर
पंढरपूर:संपूर्ण महाराष्ट्राचाच उत्सव असणारी पंढरपूरची वारी काही महिन्यांत सुरु होणार असून, त्यासाठी आता संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थानमागोमागच आळंदी मंदिर समितीकडून वारी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यानुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच 11 जून 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे.
कसा असेल माऊलींचा पालखी सोहळा?
11 जून 2023, रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. ज्यानंतर ही पालखी वारकऱ्यांसह पुणे भवानीपेठ, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करणार आहे.
तब्बल 17 दिवसांच्या पायवारीनंतर ही पालखी 28 जून 2023 रोजी पंढरपुरात प्रवेश करेल. त्यानंतर 29 जून 2023 म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान असणार आहे. 3 जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच मुक्कामी असून, त्याच दिवशी विठ्ठल- रुक्मिणीभेटीनंतर पालखीचा परचीचा प्रवास वाखरीहून सुरु होईल.
कसा असेल तुकोबारायांच्या पालखीचा प्रवास ?
आळंदीहून माऊलींची पालखी प्रस्थान ठेवण्यापूर्वी श्री संत तुकाराम महाराजांची पालखू श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे. एक दिवस आधी, म्हणजेच 10 जून 2023 रोजी ही पालखी ईनामदार साहेब वाडा, देहू येथून प्रस्थान ठेवेल. पुढं ही पालखी आकुर्डी, नानापेठ पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उडंबडी गवळ्याची, बारामती, सणसर, आंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोलीमार्गे वाखरीला पोहोचेल. 28 जून 2023 ला पालखी पंढरपुरात संत तुकाराम महाराज मंदिर (नवी इमारत) येथे मुक्कामी असेल. 29 जून 2023 ला पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडेल.
कधी आहेत दोन्ही पालख्यांचे रिंगण सोहळे?
संत तुकाराम महाराज पालखी
20 जून 2023 – बेलवडी (गोल रिंगण)
22 जून 2023 – इंदापूर (गोल रिंगण)
24 जून 2023 – अकलूज माने विद्यालय (गोल रिंगण)
25 जून 2023 – माळीनगर (उभं रिंगण)
27 जून 2023 – बाजीराव विहिर (उभं रिंगण)
28 जून 2023 – वाखरी (उभं रिंगण)
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
20 जून 2023 – चांदोबाचा लिंब (उभं रिंगण)
24 जून 2023 – पुरंवडे (गोल रिंगण)
25 जून 2023 – खुडूस फाटा (गोल रिंगण)
26 जून 2023 – ठाकूरबुवाची समाधी (गोल रिंगण)
27 जून 2023 – बाजीरावची विहीर (गोल आणि उभं रिंगण)
28 जून 2023 – वाखरी (उभं रिंगण)
दरवर्षी मोठ्या संख्येनं पालखी सोहळ्याला तरुणाईचीही हजेरी असते. कामाच्या व्यापातून तुम्हीही पालखी सोहळ्यासाठी जाऊ इच्छिता तर, माऊलींच्या पालखीत 16 जूनला जेजुरीत, 18 जून रोजी नीरा स्नानासाठी हजेरी लावू शकता. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातही तुम्ही काटेवाडी येथील मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याला तुम्ही हजेरी लावू शकता. काय मग, येताय ना वारीला ?