पाण्यावर तरंगणार्या बाबांना आव्हान देणार्या अंनिसची फजिती, अंनिसचे प्रकाश मगरे पाण्यात बुडाले !
हिंगोली – मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील धोत्रा गावातील पाण्यावर तरंगणारे ह.भ.प. हरिभाऊ महाराज राठोड यांना आव्हान देणार्या अंनिसवाल्यांची ग्रामस्थांपुढे मात्र फजिती झाली.
ह.भ.प. हरिभाऊ महाराज राठोड पाण्यावर तरंगले; मात्र त्यांच्यासमवेत विहिरीत उतरलेले अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मगरे पाण्यात बुडाले. त्यांची लुंगीही सुटली आणि पाण्यात तरंगण्यासाठी ते हात हलवू लागले. ही सर्व घटना सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यावर अनेकांनी अंनिसवाल्यांवर टीका केली आहे.
१. ह.भ.प. हरिभाऊ महाराज राठोड पाण्यावर तरंगून ध्यानधारणा करतात. अंनिसवाल्यांनी ‘त्यांचा कार्यकर्ताही पाण्यावर तरंगून दाखवेल’, असे आव्हान दिले होते. त्यानुसार धोत्रा गावातील ग्रामस्थांच्या साक्षीने पाण्यावर तरंगण्याचा प्रयोग झाला.
२. या वेळी प्रथम ह.भ.प. हरिभाऊ महाराज राठोड पाण्यात उतरून ते पाण्यावर तरंगू लागले. पाण्यावर तरंगतांना त्यांनी दोन्ही पायांची मांडी घातली आणि दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करून ध्यानधारणा करत ते पाण्यावर पहुडले होते.
३. त्याच वेळी अंनिसचे प्रकाश मगरे यांनी विहिरीत उडी मारली. मगरे यांनी मात्र दोन्ही हात-पाय पसरून ते हलवण्यास प्रारंभ केला. त्या वेळी ग्रामस्थांनी त्यांना हात-पाय न हलवण्याविषयी सांगितले; मात्र असे करतांना प्रकाश मगरे यांचे शरीर पाण्याखाली गेले. केवळ डोके पाण्याच्या बाहेर राहिले; मात्र त्यांना पाण्यावर तरंगणे शक्य झाले नाही. हात-पाय हलवण्याविना त्यांना पाण्यावर तरंगता न आल्यामुळे शेवटी ते विहिरीच्या बाहेर आले.
अंनिसचे प्रकाश मगरे यांची ग्रामस्थांपुढे पोलखोल होऊनही प्रसिद्धीमाध्यमांपुढे त्यांनी ‘माझा नियमितचा सराव नसल्यामुळे मला हात-पाय हलवावे लागले’, असे सांगून जिंकल्याचा दावा केला. काही प्रसिद्ध वृत्तपत्रांनीही मगरे विजयी झाल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या (खोट्या बातम्या प्रसिद्ध करणारी वृत्तपत्रे ! – संपादक); मात्र या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर उपलब्ध असल्यामुळे सत्य प्रकार पुढे आला. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर उपलब्ध आहे. यामध्ये ह.भ.प. हरिभाऊ महाराज राठोड पाण्यावर तरंगत असल्याचे, तर प्रकाश मगरे हे पाण्यात बुडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. (अंनिसचा खोटारडेपणा ! यातून अंनिसवाल्याची वृत्ती दिसून येते. – संपादक)