पीडित मुलगी खटल्यात फितूर तरी अत्याचारी बापास वीस वर्षांची शिक्षा
नागपूर : नराधम बापाने बलात्कार केला, पीडित मुलगी देखील खटल्या दरम्यान फितूर होती. मात्र, बयाणांवरून ती पढविलेली असावी व भीतीपोटी बयाण देत असल्याचे दिसून येत असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले बापाला वीस वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला.
आरोपी विरोधात पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार उमरेड पोलिस हद्दीतील हा गुन्हा दाखल होता. ३ मे २०२१ रोजी आरोपीने दारू पिऊन मारहाण केल्याने पत्नी मुला-मुलीसह शेजाऱ्यांकडे राहण्यास गेली. दरम्यान, आरोपी तेथून पाच वर्षीय मुलीला परत घरी घेऊन गेला. त्या रात्री त्याने तिच्यावर बलात्कार केला.
याबाबत कळताच आईच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, सुनावणीदरम्यान मुलगी सुरुवातीपासून फितूर होती. तर, बचाव पक्षाने पीडित मुलीच्या आईला फेर उलटतपासणी करिता बोलावले असता तिने साक्ष बदलली. कौटुंबिक वादातून आपण ही खोटी तक्रार दिल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले.
मात्र, दरम्यानच्या काळात तिच्या समोर ठेवण्यात आलेला दोन एकर जमिनीचा प्रस्ताव मान्य झाला असू शकतो व त्यामुळेच बचाव पक्षाने तिच्या फेर उलटतपासणीचा घाट घातला आणि व तिनेही साक्ष फिरविली, अशी शक्यता असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. या प्रकरणातील वैद्यकीय अहवालानुसार,
पीडित मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट होते. आईची पोलिस तक्रारीतील माहिती आणि तिची न्यायालयातील पहिली साक्ष ही वैद्यकीय पुराव्यांशी तंतोतंत जुळणारी होती. ही बाब लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. शासनातर्फे ॲड. आसावरी परसोडकर यांनी बाजू मांडली.