शिक्षिकेचे बनावट टीईटी प्रमाणपत्र उघड
नाशिक : (आशोक कुंभार ) शिक्षकाच्या नोकरीसाठी मालेगाव तालुक्यातील एका महिलेने टीईटीचे बनावट प्रमाणपत्र देऊन शिक्षण विभागासह शासनाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून समोर आली आहे.संपूर्ण राज्यात टीईटी घोटाळा गाजलेला असताना नाशिकमध्येही एका महिलेने शिक्षिकेच्या नोकरीसाठी बनावट टीईटी प्रमाणपत्र देऊन शिक्षण विभागाची फसवणूक केली आहे.
शिक्षण विभागाच्या पडताळणीत ही बाब उघड झाल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे पाडा येथील संशयित महिला शिक्षिका तेजल रवींद्र ठाकरे (२६) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ठाकरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजल ठाकरे यांनी शिक्षकाच्या नोकरीसाठी १ जून २०१७ रोजी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात नोकरीसाठी टीईटीचे बनावट प्रमाणपत्र दिले होते.
परंतु, त्यानंतर २००८ मध्ये राज्यात टीईटी परीक्षेतील महाघोटाळा उघड झाल्याने राज्यभरातील शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी होत असताना नाशिकमध्ये तेजल ठाकरे यांचे टीईटी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळल्याने राज्यात २०१८ पूर्वीही टीईटीच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक बार या प्रकरणातून समोर आली आहे. या प्रकरणात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक जे. के. माळी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.