संभाजीनगरमधील घटना दुर्देवी, कुणीही राजकारण करू नये :देवेंद्र फडणवीस
नागपूर : संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. काही लोकांकडून भडकाऊ भाषण देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.अशा परिस्थितीत काय बोलावं, याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. सर्वांनी शांतता राखायला हवी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या घटनेला कोणी राजकीय रंग देत असतील तर यापेक्षा जास्त दुर्देवी काहीही नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नागपुरात दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस हे रामनवमिनिमित्त नागपुरात आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी रामनगर येथील राममंदिरचे दर्शन घेतले आणि भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, नागपूरच्या शोभायात्रेचे खूप महत्व आहे. यानंतर पत्रकारांनी त्यांना संभाडजीनगर येथील घटनेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुणीही याचे राजकारण करू नये. तसेच सर्वांनी शांततेत रामनवमीचा कार्यक्रम पार पाडावा. कुठेही गडबड होऊ नये. तसेच शांततेचा भंग होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, तणाव निर्माण होईल, असं वर्तन कोणीही करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.