देवस्थान जमिनी कसणार्यांच्या नावे करण्यासाठी कायदा करणार
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_2023-03-18-12-32-23-04_a71c66a550bc09ef2792e9ddf4b16f7a-1.jpg)
मुंबई: देवस्थान जमिनी कसणार्यांच्या नावे करण्यासाठी कायदा करण्यात येणार असून, तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. या अतिक्रमणास प्रतिबंध करण्यास अपयशी ठरणार्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी. तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य सरकारने शुक्रवारी विविध निर्णय जाहीर केले. कांद्याच्या सानुग्रह अनुदानात वाढ करण्यात आली आहे; तर वन जमिनी, देवस्थान आणि गायरान जमिनींबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्री समिती नेमली आहे. यासह अन्य निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
नाशिकहून निघालेला शेतकरी लाँग मार्च वाशिंद येथे येऊन थांबला आहे. गुरुवारी माजी आमदार जीवा गावित यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निर्णयांवर निवेदन केले.
राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्यात आता 50 रुपये वाढ करून हे अनुदान 350 रुपये करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मंत्र्यांची समिती
आदिवासी जी जमीन कसतात त्यांच्या ताब्यात असलेली चार हेक्टरपर्यंतची वन जमीन असणार्या शेतकर्यांच्या नावे करून सात-बारावर नाव लावणे, देवस्थान आणि गायरान जमिनी कसणार्यांच्या नावे करणे, ज्या गायरान जमिनींवर घरे आहेत ती घरेदेखील नियमित करावीत, वन हक्क जमिनींचे प्रलंबित दावे, शासकीय योजनांचा लाभ या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी सर्व संबंधित मंत्र्यांची समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये माजी आमदार जे. पी. गावित आणि आमदार विनोद निकोले यांना सदस्य करण्यात आले आहे. या समितीने एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अंमलबजावणीपर्यंत माघार नाही : शेतकरी आंदोलक
राज्य सरकारने निर्णय जाहीर केले असले, तरी जोपर्यंत त्यांची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेणार नाही, असे माजी आमदार जे. पी. गावित यांनी जाहीर केले. आमचा मागच्या लाँग मार्चचा अनुभव चांगला नाही. आश्वासने देऊन ती पाळली गेली नाहीत. त्यामुळे निर्णयांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही वाशिंद येथून उठणार नाही, असे ते म्हणाले.
शेतकर्याचा मृत्यू
गेल्या 7 दिवसांच्या प्रवासाचा थकवा, त्यात नैसर्गिक संकटाची भर यामुळे मोर्चेकरी कुंडलिक जाधव (वय 47) राहणार दिंडोरी, नाशिक या शेतकर्याचा उलट्यांचा त्रास होत अचानक मृत्यू झाला. किसान सभेचा लाँग मार्च मुंबई-नाशिक महामार्गा लगत वाशिंद येथे मुक्कामी असून दिवसभर त्यांचा मुक्काम येथील ईदगाह मैदानावरच असणार आहे, रात्री पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्चेकर्यांची तारांबळ उडाली. आजारी पडलेले दिंडोरी येथील शेतकर्याला उलट्यांचा त्रास झाल्याने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. बरे वाटल्याने ते पुन्हा मोर्चात सामिल झाले. मात्र, शुक्रवारी रात्री 9 च्या दरम्यान त्यांना पुन्हा उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांची प्राणज्योत मावळली.