बनावट स्वाक्षरी करून शिक्षकाचा पगार काढला
टेंभुर्णी: (आशोक कुंभार )शिक्षक शाळेत हजर नसताना परस्पर मान्यता घेऊन बनावट स्वाक्षरी करून मुख्याध्यापकानेच सुमारे साडेतीन लाख रुपयांचा पगार काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, मुख्याध्यापक फरार झाला आहे. बाळासाहेब केचे असे गुन्हा दाखल झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. सागर हणमंत नवगण (रा. कुडाळ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
माढा तालुक्यातील आलेगाव येथे सरस्वती माध्यमिक विद्यालय असून, या विद्यालयाला 20 व 40 टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. या विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे यांनी सागर नवगण यांच्या कागदपत्राच्या झेरॉक्सवरून 2011 साली माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याकडून परस्पर शिक्षक मान्यता मिळविली. शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारची खातरजमा व तपासणी न करता मान्यता दिली. नवगणच्या नावे नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2022 या कालावधीतील पगार 3 लाख 58 हजार 623 रुपये शालार्थ प्रणालीवर दाखवून काढून घेण्यात आला. ही रक्कम भीमानगर येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून बनावट सही करून काढून घेण्यात आली.
दरम्यान, ही घटना साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये असलेले सागर नवगण यांना कळताच त्यांनी शिक्षण उपसंचालकाकडे तक्रार केली. यानंतर या घटनेची चौकशी करण्यात आली. तपासात झेरॉक्स कागदपत्रांच्या आधारे मान्यता घेऊन परस्पर बनावट सहीने रक्कम उचलल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक बाळासाहेब केचे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.