“आम्हाला सावत्र आई नको…”; 10 वर्षांच्या लेकीने थांबवलं 5 मुलांच्या बापाचं दुसरं लग्न
बिहार:पप्पा दुसरं लग्न करणार आहेत… आमची काळजी कोण घेईल, आमच्या कुटुंबात कोणीही नाही. त्यामुळे हे लग्न थांबवा”. बिहारमधील शिवहरमध्ये एका 10 वर्षीय मुलीने पोलिसांना ही विनंती केली आहे. एवढेच नाही तर मुलीच्या या आवाहनाचा परिणाम झाला, पोलीस पथकानेही तातडीने कारवाई करत त्या व्यक्तीचे दुसरे लग्न होऊ दिले नाही. यासाठी पोलीस अधिकाऱ्याने मुलीच्या वडिलांशी संवाद साधला. त्यांची समजूत घातली आणि पुन्हा लग्न न करण्याबाबत समज दिली.
वडिलांचे दुसरे लग्न रोखण्यासाठी 10 वर्षांच्या मुलीने ज्या धाडसाने आवश्यक पाऊले उचलली त्याची शहरात चर्चा रंगली आहे. वडिलांचे दुसरे लग्न थांबल्याने मुलीने यासाठी पोलीस ठाणे गाठले. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या व्यक्तीला आधीच 5 मुले आहेत. त्यापैकी चार मुली आहेत. मनोज कुमार राय असे या व्यक्तीचे नाव असून त्याने दोन वर्षांपूर्वी पहिली पत्नी गमावली होती. आता तो दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता.
असे सांगितले जात आहे की, 10 वर्षांच्या मुलीला तिचे वडील मनोज मंदिरात एका महिलेशी लग्न करणार असल्याचे समजताच ती अस्वस्थ झाली. काही गावकऱ्यांना सोबत घेऊन तिने पिपराही पोलीस ठाणे गाठले आणि वडिलांचे दुसरे लग्न रोखण्याची विनंती पोलिसांना केली. ‘आम्हाला सावत्र आई नको, वडिलांनी तिच्याशी लग्न केले तर त्याचा त्रास होऊ शकतो’, असे ती पोलिसांसमोर म्हणाली.
रडत रडत मुलीने पोलिसांना सांगितले की तिच्या वडिलांनी आपली सर्व जमीन, मालमत्ता आणि इतर गोष्टी पत्नीला देण्याची तयारी केली आहे. त्यांनी असे केले तर आम्हा पाच भावा-बहिणींचे काय होईल. आमच्याकडे लक्ष देणारे कोणी नाही. मुलीने पोलिसांकडे विनवणी केली की, जर माझ्या वडिलांनी आपली सर्व जमीन आणि मालमत्ता महिलेला भेट दिली तर आम्ही कसे जगू? कुटुंबात आमची काळजी घेणारे कोणी नाही. त्यामुळे कृपया हे लग्न थांबवा. मुलीसोबतच तिच्यासोबत असलेल्या गावकऱ्यांनीही पोलिसांकडे तशीच विनंती केली.