ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

नव्या ठाणे रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा, जागा हस्तांतरणास उच्च न्यायालयाची परवानगी


ठाणे : (आशोक कुंभार ) ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी मनोरुग्णालयाची जागा देण्यास उच्च न्यायालयाने अखेर शुक्रवारी परवानगी दिली. केवळ स्थानकाच्या कामासाठीच न्यायालयाने जागा हस्तांतरण स्थगिती उठवली असून, गेली अनेक वर्षे रखडलेल्या नवीन स्थानक उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार कमी व्हावा या उद्देशातून ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक उभारण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालयाच्या १४.८३ एकर भूखंडावरील आरक्षणात यापूर्वीच बदल करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजित रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जागा देताना त्याबदल्यात ठाणे येथे अन्यत्र १४.८३ एकर जागा देऊन सुसज्ज मनोरुग्णालय बांधून देण्याचे आश्वासनही दिले होते.

नव्या स्थानकाच्या आराखडय़ास रेल्वे विभागाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. रेल्वे हद्दीतील कामे रेल्वे विभागामार्फत तर इतर कामे महापालिका करणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे काम स्मार्ट सिटी योजनेतून होणार असून, या कामासाठी २८९ कोटी रुपये खर्चालाही मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर नव्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, तिथल्या प्रवासी सेवा, वाहनांसाठी पूल आणि विद्युत व्यवस्था अशा कामांची निविदा महापालिकेने यापूर्वीच काढली आहे. त्यापैकी रस्त्यांची कामेही सुरू केलेली आहेत. मनोरुग्णालयाची जागा आरोग्य विभागाने रेल्वेकडे हस्तांतरित केल्यानंतर स्थानक उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार होती. परंतु, एका जनहित याचिकेवर सुनावणी घेताना मनोरुग्णालयाची जागा कुणालाही हस्तांतरित करून ‘थर्ड पार्टी इंटरेस्ट’ निर्माण करू नका, असे आदेश १२ ऑगस्ट, २०१५ रोजी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे या रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतरित होत नव्हती. परिणामी तांत्रिक आणि वित्तीय मंजुरी असतानाही रेल्वे स्टेशनच्या उभारणीचे काम सुरू होत नव्हते.

हा न्यायालयीन तिढा दूर करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आणि ठाणे महापालिकेला दिले होते. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या होत्या. त्यानंतर शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात नुकतेच एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. त्यात व्यापक जनहितासाठी नवे ठाणे स्थानक उभारणीची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. मनोरुग्णालयाच्या ७२ एकर जागेपैकी १४.८३ एकर जागा रेल्वे स्थानकासाठी आवश्यक आहे. त्या जागेवर रेल्वे स्थानक तयार झाल्यास केवळ ठाणेच नव्हे तर मुलुंड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भारही हलका होणार आहे.

ठाणे आणि मुलुंड शहरांचा विस्तार झपाटय़ाने होत असून या दोन्ही ठिकाणांहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे व्यापक जनहिताचा विचार करता जागा हस्तांतरणाबाबतचे स्थगिती आदेश न्यायालयाने उठवावेत अशी विनंती त्या प्रतिज्ञापत्राव्दारे करण्यात आली होती. ही विनंती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापुरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी शुक्रवारी मान्य केली आणि स्थगिती आदेश उठविले आहेत.

दोन वर्षांपासून या निर्णयाची वाट पाहात होतो. ठाणे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याबरोबरच त्याठिकाणी नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु, प्रवाशांचा भार जास्त असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे या स्थानकावरील भार कमी करण्यासाठी नवे स्थानक महत्त्वाचे आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे महापालिका

फायदे काय?

नव्या स्थानकामुळे ठाणे स्थानकातील ३५ टक्के तर, मुलुंड रेल्वे स्थानकातील २५ टक्के गर्दी कमी होणार आहे. या स्थानकाचा फायदा घोडबंदर, वागळे इस्टेट, पोखरण रोड परिसरातील प्रवाशांना होणार आहे. त्याचबरोबर नव्या स्थानकामुळे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक विभागली जाणार असून स्थानक भागातील कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल.

व्यापक जनहित आणि पायाभूत सुविधांसाठी अत्यावश्यक प्रकल्पांसाठी न्यायालय कायमच सकारात्मक भूमिका घेत असते. त्याचा प्रत्यय या निर्णयाच्या निमित्ताने पुन्हा आला. रेल्वे स्थानकाचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या जातील.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button