पोलीस निरीक्षकांना निरोप देताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर!
जामखेड : कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याची बदली हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे. तो सरकारी अधिकारी आहे म्हणजे त्याची बदली ही होणारच. परंतु ज्या भागात तो काम करतो त्या भागासाठी केलेल्या कामाच्या जोरावर तो अधिकारी जनतेच्या गळ्यातीत ताईत बनतो.
असाच एक अधिकारी म्हणजे जामखेड स्टेशनचे बदली झालेले पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड. तालुक्यात प्रथमच एका अधिकाऱ्यांच्या बदलीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची पारनेर पोलीस स्टेशनला बदली झाली. याठिकाणी मुंबई येथून महेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्याअनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनमध्ये जामखेडकरांच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थित होती. अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करताना गायकवाड यांच्या कामाचे कौतुक केले.
सेवेच्या कालावधीत पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केलेले काम, राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना, त्यांची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक यांसारख्या बऱ्याच गोष्टींमुळे त्यांनी जनतेच्या हृदयात वेगळेच स्थान निर्माण केले. अशा या जिगरबाज आणि दबंग अधिकाऱ्याच्या निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरतो आहे.
एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर जामखेडकरांनी मिळून अशाप्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम जामखेड तालुक्यात प्रथमच झाला असावा. अशाच एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याला निरोप देताना सहकाऱ्यांनी दिलेल्या निरोपामुळे निरीक्षक गायकवाड देखील भारावले. त्यांनीही आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. कदाचित असे चित्र याअगोदर कधीही जामखेडकरांनी बघितले नसावे.
निरीक्षकांना अश्रू अनावर
शेवटची भेट घेत असताना अनेक जण भावूक झाले. सर्वच पोलीस कर्मचारी रडू लागले. साहेब तुमची खूप आठवण येईल, अशी भावना देखील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. त्यांनीही आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी शहरात 27 महिन्याचा कालावधी पूर्ण केला होता. दोन वर्ष 3 महिने त्यांनी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावलं. निरोप देताना त्यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले.