बाललैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपिला एक वर्ष सक्तमजुरी
कराड : ( आशोक कुंभार )बाललैंगीक अत्याचारप्रकरणी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी तसेच सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या.
के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली.
रोहीत सुनिल माने (वय २१, रा. गुढे, ता. पाटण) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी तळमावले येथे शिक्षणासाठी येत असताना ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत आरोपी रोहित माने हा संबंधित मुलीच्या विद्यालयाच्या आवारात थांबत होता. तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तु आवडतेस, असे म्हणून त्या मुलीला तीचा मोबाईल क्रमांक मागत होता. मुलीने मोबाईल क्रमांक न दिल्यामुळे त्याने मुलीला मारण्याची धमकी देत तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
याबाबत पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन ढेबेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी रोहित माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. पाच पक्षाच्यावतीने सरकार साक्षिदार तपासण्यात आले. त्यामध्ये तपासी अधिकारी, पिडीत मुलगी यांच्या साक्ष महत्वपुर्ण ठरल्या.
सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रोहित माने याला एक वर्ष सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात सरकार पक्षाला अॅड. ऐश्वर्या यादव, अॅड. संध्या चव्हाण, अॅड. कोमल लाड, अॅड. मनिषा जावीर यांनी सहकार्य केले.