बँकेच्या सहायक व्यवस्थापकाकडून गंडा; व्यावसायिक टार्गेटवर, चार कोटींचा चुना
मुंबई : एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या माजी ३२ वर्षीय सहाय्यक व्यवस्थापकाने शहरातील दोन व्यवसायांची ४.१७ कोटींची फसवणूक केली. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
त्याने, तो दुबईस्थित एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. त्याच्या कंपनीत टक्केवारीचा हिस्सा मिळवण्यासाठी त्याने त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून गंडविले.
प्रतीक राधाकृष्णन एका बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करत होता, तेथून त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. त्याने मुंबई आणि चेन्नईमध्ये अनेक लोकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.
झवेरी बाजारातील कृष्णा देवासी आणि त्यांचे नातेवाईकासोबत राधाकृष्णनने मैत्री केली. सुरुवातीला त्याचे वाहन भाड्याने देत विश्वास संपादन केला. त्यानंतर दुबईत काम करत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांना वाटा देण्याचे आश्वासन देऊन विविध बहाण्याने त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
आरोपींनी अशाच प्रकारे चेन्नई येथील एका व्यावसायिकाला कपड्याच्या ब्रँडची फ्रेंचायझी देण्याचे आश्वासन देऊन २ कोटी ८२ लाखांना गंडविले. त्याने बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्केही बनवून व्यावसायिकासोबत करार केला. तो दुबईहून परतल्यावर चेन्नई पोलिसांनी त्याला अटक केली.
दुबईच्या बँक खात्यात ५ हजार कोटी
आरोपी एका राष्ट्रीयीकृत बँकेत काम करायचा. मात्र, बँकेने त्याला काढून टाकले. “त्याने तक्रारदाराला चेन्नई पोलिसांनी अटक केल्यावर वकिलांची फी देण्यासही भाग पाडले. दुबईतील विविध बँक खात्यांमध्ये ५ हजार कोटींहून अधिक रक्कम असल्याचे सांगून, तक्रारदाराला व्याजासहित सर्व पैसे देणार असल्याचे सांगितल्यामुळे तक्रारदाराने ते पैसेही दिल्याचे समोर आले आहे.