जनरल नॉलेजधार्मिक

कार्तिकी एकादशीला सुरू करा नित्य हरिपाठ आणि म्हणा ‘हा’ बीजमंत्र!


दैनंदिन उपासना सुरू करण्याचा विचार करत असाल तर बाबा महाराज सातारकर यांनी शिकवलेला हरिपाठ आणि बीजमंत्र तुमच्या कामी येईल हे नक्की!

आयुष्यात एकही एकादशी ज्यांनी कधीच चुकू दिली नाही, ते बाबामहाराज आयुष्याच्या अखेरच्या क्षणीही पाशांकुश एकादशीचे व्रत पूर्ण करून गेले. ‘आईच्या उदरात असल्यापासून मी वारी केली आणि जन्माला आल्यावर आयुष्यभर वारकरी बनून राहिलो’, असे बाबा महाराज कायम सांगत असत. त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेला मंत्र याची कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने उजळणी करू.

वारकरी कीर्तनाची परंपरा देश-विदेशात नेणारे नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे अर्थात ह.भ.प.बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र. त्यांनी आपल्या कीर्तन प्रवचनातून श्रोत्यांना अध्यात्माची गोडी लावली. त्यांच्या मधुर आवाजात ‘जय जय राम कृष्ण हरी’ हे भजन ऐकणे, म्हणजे पर्वणीच असे!

बाबामहाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी वकिलीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरात तीन पिढ्यांपासून कीर्तन प्रवचनाची परंपरा सुरू होती, ती त्यांनीदेखील पुढे नेली. त्यांच्या कीर्तनाला गावागावातून हजारोंचा जनसमुदाय गोळा होत असे. त्यांच्या रसाळ वाणीने मंत्रमुग्ध होत असे. शास्त्र, पुराणे, संतसाहित्य, सामाजिक, राजकीय विषयांची सरमिसळ करत ते श्रोत्यांना तासन तास जागेवर खिळवून ठेवत असत. आजच्या मोबाईल युगातही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे कीर्तन प्रवचन ऐकणाऱ्यांची कमतरता नाही. एवढेच नव्हे, तर अनेक घरात सायंकाळी बाबामहाराजांच्या स्वरातील हरिपाठाबरोबर दिवेलागण होते.

बाबामहाराज सातारकर यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचे ब्रीद आणि त्याला जोडून आलेली पथ्ये पाळली. या वाटेवर प्रवास करणाऱ्या, तसेच अध्यात्माची गोडी असणाऱ्या आबालवृद्धांना ते मार्गदर्शन करतात,

ज्ञानोबारायांनी पांडुरंगाला केवळ देव मानले नाही, तर माय बाप मानले. हा जिव्हाळा जसा माऊलींच्या ठायी होता, तसा आपल्या ठायी निर्माण व्हावा, म्हणून प्रतिवर्षी आपण वारीला जातो. वारी हे केवळ भेटीचे निमित्त. त्यानिमित्ताने वारकरी एकत्र येतात, भजन कीर्तन करतात, सत्संग घडतो. पण पांडुरंगाचे दर्शन रोज घडावे असे वाटत असेल, तर त्याचा शोध मनाच्या गाभाऱ्यात घेतला पाहिजे.

त्यासाठी तुळशी माळ घालावी. माळ घातली की सद्गुणाकडे वाटचाल सुरू होते. आचार, विचार शुद्ध होतात. आधी आचार म्हणजे आचरण सुधारते मग आपोआप विचारही शुद्ध होऊ लागतात. माळ घालणाऱ्याने रोज सकाळी उठल्यावर पांडुरंगाची मानसपूजा करावी. विठोबाचे स्मरण करावे. त्याला मनोमन स्नान घालावे, फुले वाहावीत, गंध लावावे आणि मग तुकोबा रायांना जो मंत्र मिळाला, ‘जय जय राम कृष्ण हरी’ त्याचा जप करावा.

‘राम कृष्ण हरी’ हा बीज मंत्र आहे. बीजाचे फळ लगेच मिळत नाही. त्याला खतपाणी घालावे लागते. म्हणून रोज हा मंत्र म्हणावा. या मंत्राने मन स्वच्छ होते आणि तिथे पांडुरंग वास करतात.

माळ घालणाऱ्या व्यक्तीने तिचे पावित्र्य राखण्यासाठी काही पथ्ये पाळावीत. मांसाहार, मद्यपान, तंबाखू अशा गोष्टींचे सेवन करू नये. परस्त्री मातेसमान आणि परपुरुष पांडुरंग मानून सेवा करावी. वर्षातून एकदा पंढरीची आणि आळंदीची वारी करावी. नित्य पांडुरंग दर्शनाचा ध्यास ठेवावा.

हा ध्यास ठेवतच ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी आपले आयुष्य कीर्तन सेवेसाठी वेचले. तोच आदर्श आपणही ठेवून मार्गक्रमण करूया!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button