ताज्या बातम्या

शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांचा ‘ईओं’च्या कक्षात असाही वर्ग!


नागपूर: नवे शैक्षणिक सत्र सुरु होऊन आता महिना लोटत असताना शाळेमध्ये विद्यार्थी आहेत पण शिक्षकच नसल्याने शाळा कुलूप बंद होती. परिणामी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते.अखेर सोमवारी २४ जुलै रोजी ग्रामीण विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठली. प्राथमिक शिक्षणाधिकारी (ईओ) रोहिणी कुंभार यांचे कार्यालयात ठिय्या मांडला. एकप्रकारे ईओंच्याच कक्षात विद्यार्थ्यांनी आपला वर्ग भरवित ‘मॅडम आमच्या शाळेसाठी शिक्षक द्या’ अशी आर्त हाक दिली अखेरीस चिमुकल्यांची मागणी स्वीकारत कुंभार यांनी तडकाफडकी त्या शाळेसाठी नजीकच्या दोन शिक्षकी शाळेतील एका शिक्षकाला जबाबदारी सोपवली.



काटोल तालुक्यातील मलकापूर या गावातील हे विद्यार्थी होते. मलकापूर या गावामध्ये आदिवासी आणि भटक्या जमातीचे नागरिक वास्तव्यास असून, येथे जि.प.ची शाळा असून पक्की इमारत आहे. एकंदर १५ विद्यार्थी शिकत आहेत. परंतु यंदा शैक्षणिक सत्रापासून येथे शिक्षकच उपलब्ध न झाल्याने शाळा पूर्णपणे बंदच होती. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.

शिक्षक मिळावा यासाठी पालकांच्या माध्यमातून यापूर्वीही सीईओंकडे निवेदनाव्दारे विनंती करण्यात आली. परंतु शिक्षकच उपलब्ध न झाल्याने सरतेशेवटी १२-१३ विद्यार्थ्यांनी पालकांसह सोमवारला सकाळी जि.प. मुख्यालय गाठले. प्रथम विद्यार्थी सीईओंचीच भेट घेणार होते. परंतु त्या रजेवर असल्याचे लक्षात आले. विद्यार्थी जि.प.मध्ये दाखल झाल्याचे कळताच कुंभार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कक्षात बोलावून घेतले. त्यांना पाणी पाजून त्यांची ओळख परेड केली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘मॅडम आमच्या शाळेसाठी शिक्षक द्या हो’अशी विनवणी केली.

ZP School : मुलांची मागणी अन् मिळाला शिक्षक

मुलांच्या मागणीनंतर कुंभार यांनी काटोल गटशिक्षणाधिकाऱ्याशी संपर्क साधून नजीकच्या कामठी (मासोद) येथील ३७ विद्यार्थी पटसंख्येच्या आणि दोन शिक्षकी शाळेतील धनराज कुमरे नामक एक शिक्षक मलकापूर शाळेमध्ये रवाना करण्यात आला. विद्यार्थ्यांना गणवेशासह पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button