नंदूरबारमध्ये ७० हजाराची लाच घेताना मंडळाधिकाऱ्याला अटक
वाळूने भरलेला ट्रक सोडण्यासाठी ७० हजाराची लाच घेताना मंडळाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याची घटना नंदुरबारात घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा तहसीलदार कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली.
प्रशांत निळकंठ देवरे (४२) असे ताब्यात घेण्यात आलेल्या मंडळाधिकाऱ्याचे नाव आहे. प्रशांत देवरे याने २१ फेब्रुवारी रोजी नंदुरबार शहरातील करण चाैफुली परिसरातून वाळूने भरलेला ट्रक अडवून तहसीलदार कार्यालयात जमा केला होता. हा ट्रक सोडून देण्यासाठी त्याने १ लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान १ लाख रुपये द्यायचे नसल्याने ट्रकमालकाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. यातून ही कारवाई झाली. सोमवारी सायंकाळी १ लाख रुपयातील ७० हजाराचा पहिला हप्ता घेण्यासाठी मंडळाधिकारी प्रशांत देवरे हा तहसीलदार कार्यालय परिसरात आला होता. याठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ अटक केली.
संशयित मंडळाधिकाऱ्याविरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झाेडगे,राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, जगदीश बडगुजर यांनी केली.