
पुणे: कर्वेनगरमधील एका (Pune Crime) नामांकित मुलींच्या शाळेत (Pune News) दाखला घ्यायला आलेल्या तरुणीचा नंबर घेऊन तिला वारंवार अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल बावधने (वय 43, रा. कोथरूड) असे या शिपायाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय तरुणी दाखल्यासाठी शाळेत आली होती. त्यावेळी मुख्याध्यापिका उपलब्ध नसल्याने तिच्या दाखल्यावर सही राहिली होती. त्यावेळी बावधने याने तरुणीचा मोबाईल नंबर घेतला आणि दाखला पूर्ण झाल्यावर कळवितो असे सांगितले. त्यानंतर त्याने वारंवार त्या तरुणीला मेसेज पाठवून त्रास दिला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात उशीर होत असल्याचे कारण देत पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील मराठे यांच्या नेतृत्वाखाली कर्वेनगर पोलिस चौकी आणि शाळेच्या गेटसमोर आंदोलन केले.
विशेष म्हणजे आंदोलनादरम्यान मुख्याध्यापकांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास नकार दिला. सुरक्षारक्षकांनी शाळेचे गेट बंद केले, तर शिपायाला मागच्या गेटमधून बाहेर काढण्यात आल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पोलिस शाळेत पोहोचले तेव्हा शिपाई शाळेत नव्हता, अशी माहिती सुनील मराठे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बावधने याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामदास भरसठ करत आहेत.
या संदर्भात मुख्याध्यापिका आशा कांबळे यांना विचारले असता त्यांनी, “हे प्रकरण नक्की काय आहे याची मला माहिती नाही. शिपायाने काय केले याबद्दलही मला ठाऊक नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, संस्थेच्या सचिवांनी संबंधित शिपायाला निलंबित केल्याचे सांगितले असून, “त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. शाळेत अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना कठोर सूचना देण्यात येतील,” असे त्यांनी नमूद केले.
या घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू असून पालकांनीही शाळा प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत जागरूकता आणि जबाबदारी वाढवण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.











