क्राईम

सैतान जागा झाला! फोन हिसकावला,अंधारात ओढून नेले.,MBBSच्या विद्यार्थीनीवर गॅंगरेप…


पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. २०२४ मध्ये आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या ज्युनियर डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेची आठवण करून देणारी ही घटना दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात घडली आहे.

या महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर महाविद्यालयीन रुग्णालय परिसरातून खेचून नेत बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच शिक्षण संस्थांमधील महिलांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

नेमकी घटना काय घडली?

पीडित विद्यार्थिनी ही ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी असून ती दुर्गापूरच्या शोभापूर परिसरात असलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५ च्या रात्री ८:३० वाजताच्या सुमारास विद्यार्थिनी तिच्या वर्गमित्रासह कॅम्पसबाहेर जेवण करण्यासाठी गेली होती. परत येत असताना, दोन-तीन तरुणांनी त्यांना अडवले. त्यापैकी एका आरोपीने विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून घेतला, तर दुसऱ्या आरोपीने तिला एका निर्जन ठिकाणी ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, त्या मुलीसोबत असलेल्या तिच्या मैत्रीणींनी घटनास्थळावरुन पळ काढल्याचे देखील सांगितले जात आहे.

सामूहिक बलात्काराचा आरोप

पीडितेच्या मैत्रिणीने तिला वाचवून त्याच वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलिसांनी ही सामूहिक बलात्काराची तक्रार असल्याचे सांगितले असून, सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला आहे आणि घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या तिच्या वर्गमित्राची भूमिका देखील तपासली जात आहे.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, महिला आयोगाचा दौरा

आरजी कार प्रकरणासारख्या गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाल्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी महाविद्यालयाच्या सुरक्षेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जर रुग्णालयात पुरेशी सुरक्षा असती, तर माझी मुलगी या परिस्थितीत आली नसती.”

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोग (NCW) शनिवारी (११ ऑक्टोबर २०२५) दुर्गापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या घटनास्थळी भेट दिली आहे.

आरोग्य शिक्षण संचालकांनी मागवला अहवाल

या घटनेची गंभीर दखल आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. आरोग्य शिक्षण संचालक इंद्रजित साहा यांनी संबंधित खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य भवनातील सूत्रांनुसार, पोलीस तपासावरही आरोग्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.

दुसऱ्या राज्यातील विद्यार्थिनीवर झालेल्या या सामूहिक बलात्काराच्या आरोपामुळे दुर्गापूर वैद्यकीय महाविद्यालयाचे वातावरण गोंधळात पडले आहे. विद्यार्थ्यांनी या निषेधार्थ मूक आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button