Bira 91 : फक्त एक शब्द काढला आणि बिअर ब्रँड अडचणीत; 748 कोटींचं नुकसान… वाचा काय घडलं?

काही वर्षांपूर्वी ‘बीरा 91’ (Bira 91) या बिअर ब्रँडने बाजारात जोरदार एंट्री केली. तरुणाईमध्ये त्याची क्रेझ इतकी वाढली की, हा ब्रँड एक यशस्वी स्टार्टअप स्टोरी बनला होता.
पण, तुम्हाला विश्वास बसणार नाही, कंपनीने नावामध्ये केलेला एक छोटासा बदल, आज या ब्रँडला बुडवण्याच्या मार्गावर घेऊन आला आहे!
बीरा 91 मालक कंपनी आहे ‘B9 Beverages’. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे संस्थापक अंकुर जैन यांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे. कारण काय? तर, कर्मचाऱ्यांचे तीन ते पाच महिन्यांचे पगार थकले, विक्रेत्यांची बिले दिली नाहीत, आणि कंपनीत सगळा गोंधळ सुरू आहे.
पण, या सगळ्या समस्यांचे मूळ कारण काय आहे? फक्त एका शब्दाचा बदल!
‘तो’ शब्द काढला आणि… आयुष्य बदलून गेलं!
2023-24 मध्ये कंपनीने आपले कायदेशीर नाव ‘B9 Beverages Private Limited’ मधून ‘Private’ हा शब्द काढून टाकला आणि ते ‘B9 Beverages Limited’ झाले. गुंतवणूकदार डी. मुथुकृष्णन यांनी सांगितलं की, ही चूक कंपनीला खूप महागात पडली. हा नामबदल इतका मोठा ठरला की, एका रात्रीत सर्व राज्यांनी बीरा 91 च्या विक्रीवर बंदी घातली!
कल्पना करा: तुम्ही फक्त नावातील एक शब्द बदलला आणि तुम्हाला अचानक प्रत्येक राज्यात, प्रत्येक उत्पादन प्रकारासाठी नवीन परवाने, नवीन मंजुऱ्या आणि नवीन लेबल घ्यावे लागले. या गोंधळामुळे अधिकारी वर्ग नवीन नावाला वेगळी कंपनी मानू लागले.
विक्री थांबली, नुकसान वाढले
नाव नोंदणी आणि कायदेशीर मान्यतेच्या या खेळात कंपनीची विक्री अनेक महिने थांबली. बिअर उत्पादन असूनही ती विकता येत नव्हती. या काळात कंपनीचा सुमारे 80 कोटी रुपये किमतीचा बिअरचा स्टॉक फेकून द्यावा लागला.
या सर्व बदलाचा कंपनीला मोठा धक्का बसला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, बीरा 91 चा एकूण महसूल (उत्पन्न) 638 कोटी रुपये होता, पण झालेले निव्वळ नुकसान त्याहून जास्त होते. तब्बल 748 कोटी रुपये!
याच काळात त्यांची विक्री 22% ने कमी झाली, तर नुकसान 68% ने वाढले.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, उत्पादन तर जुलै महिन्यातच पूर्णपणे थांबले आहे.
या सगळ्या गडबडीमुळे, कंपनीमध्ये 500 कोटी रुपये गुंतवण्यास तयार असलेल्या ब्लॅकरॉक सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनीही आपले हात मागे घेतले.
संस्थापक काय सांगतात?
कर्मचारी आणि विक्रेत्यांचे पैसे थकल्याचे संस्थापक अंकुर जैन यांनी मान्य केले आहे. त्यांच्या मते, गेल्या दीड वर्षांत नावात बदल, सरकारी धोरणे आणि फंड मिळण्यास झालेल्या विलंबाने कंपनीचे कंबरडे मोडले आहे.
प्रश्न हा आहे की, नावातील एका बदलामुळे इतक्या लोकप्रिय ब्रँडचा असा अचानक ऱ्हास होऊ शकतो, यावर तुमचा विश्वास बसेल का? एका छोट्या ‘गोफ-अप’ने करोडो रुपयांची कंपनी अडचणीत आणली आणि आता कर्मचारीच संस्थापकांना बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. बीरा 91 या संकटातून बाहेर पडणार की, ही स्टोरी इथेच संपणार?











