कंबरदुखीवर उपचार म्हणून गिळले 8 जिवंत बेडूक!अन पोटात तीव्र वेदना …

बीजिंग : चिन्यांच्या अजब देशातील हे ‘लेटेस्ट अजब’! तिथे लोक माणूस सोडून काहीही खात असतात हे आपल्याला माहिती आहे, पण औषध म्हणून कुणी एक-दोन नव्हे तर आठ जिवंत बेडूक गट्टम करील असे आपल्याला वाटले नव्हते.
अस्वस्थ वाटल्यास नेहमी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा जीवावर बेतू शकते. मात्र, अनेकांना घरीच स्वतःचा उपचार करण्याची किंवा गुगल-एआयच्या आधारावर औषधोपचार करण्याची सवय असते, जी धोकादायक ठरू शकते. अशीच चूक एका चीनी वृद्ध महिलेला चांगलीच महागात पडली, तिचा जीव जाता-जाता वाचला.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, 82 वर्षीय झांग नावाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेला कंबरदुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांना दाखवण्याऐवजी, तिने एकाच्या सांगण्यावरून आठ जिवंत बेडूक वेदनाशामक औषध ‘ब्रुफीन’ समजून चघळून गिळले. झांग यांच्या मुलाने सांगितले की, त्यांच्या आईने लोककथांमध्ये ऐकले होते की बेडूक खाल्ल्याने पाठ आणि कंबरदुखीमध्ये आराम मिळतो. त्यानंतर त्यांनी स्वतः काही बेडूक पकडले आणि काही कुटुंबीयांकडून मिळवून घेतले. त्यानंतर त्यांनी एक-एक करून ते बेडूक खाण्यास सुरुवात केली.
या अपरंपरागत आणि अशास्त्रीय उपचारामुळे त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्यांना झेजियांग प्रांतातील हांग्जो येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. मुलाने डॉक्टरांना सांगितले, ‘माझ्या आईने आठ जिवंत बेडूक खाल्ले आहेत. आता तीव्र वेदनांमुळे त्यांना चालताही येत नाहीये.’ झांग या दीर्घकाळपासून हर्निएटेड डिस्कच्या समस्येने त्रस्त होत्या. कोणीतरी त्यांना सांगितले की, बेडूक गिळल्याने कंबरदुखी कमी होऊ शकते, म्हणून त्यांनी कुटुंबीयांना जिवंत बेडूक पकडून आणण्यास सांगितले. या दाव्याला कोणताही वैद्यकीय आधार नसतानाही त्यावर विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी धोक्याचे ठरले.
रुग्णालयात झांग यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तज्ज्ञांना त्यांच्या शरीरात ऑक्सीफिल पेशींमध्ये लक्षणीय वाढ आढळली. ही वाढ परजीवी संसर्ग आणि रक्ताचे विकार यांसारख्या अनेक रोगांचे लक्षण असते. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, बेडूक गिळल्यामुळे महिलेच्या पचनसंस्थेचे नुकसान झाले आणि तिच्या शरीरात स्पार्गनमसह काही परजीवी शिरले. दोन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.











