आमदाराच्या घरात छापा; सोन्याचा खजिना पाहून EDच्या अधिकाऱ्यांना आली भोवळ; देशभरात खळबळ …

बेंगळुरू: बेंगळुरूमध्ये (Bengluru News) अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत तब्बल 50.33 कोटी रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून, चाल्लेकरे येथील दोन लॉकरमधून 24 कॅरेटचे जवळपास 40 किलो सोन्याचे बिस्किटे हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई एका आमदार आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींविरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्डरिंग आणि अवैध ऑनलाइन सट्टेबाजीच्या तपासाचा एक भाग आहे. या आमदाराने आपल्या नातेवाईक आणि सहयोगींच्या मदतीने विविध बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी संकेतस्थळे चालवली होती. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक केली गेली. खेळाडूंनी जमा केलेला पैसा विविध पेमेंट गेटवेद्वारे गोळा करण्यात येत असे. त्यानंतर तो पैसा वेगवेगळ्या नावाने उघडलेल्या बोगस खात्यांमधून फिरवण्यात येत असे, ज्यामुळे पैशांचा मूळ स्त्रोत लपवला जाई.
तपासात हेही स्पष्ट झाले आहे की या बेकायदेशीर संकेतस्थळांद्वारे देशभरात सायबर गुन्ह्यांचे जाळे निर्माण झाले होते. छोट्या मोबदल्यासाठी व्यक्तींच्या नावाने खाती उघडली जात होती आणि त्यांचा वापर गुन्हेगारी पैशांच्या हालचालींसाठी केला जात होता. या सट्टेबाजी नेटवर्कचा एकूण उलाढाल 2000 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.
या पैशांचा वापर परदेशी प्रवास, व्हिसा, आलिशान हॉटेलांमध्ये खर्च तसेच मार्केटिंग, बल्क एसएमएस, वेबसाइट होस्टिंग आणि सर्च इंजिन सेवांसाठी करण्यात आला. या सर्व सेवांसाठी लागणारा पैसा बोगस खात्यांमधून वळवण्यात आल्याचे दस्तऐवजांतून स्पष्ट झाले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीही या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर सोनं, चांदी, रोख रक्कम आणि परदेशी चलन जप्त केले होते. आता नव्याने जप्त करण्यात आलेल्या 40 किलो सोन्यामुळे या तपासाला अधिक गती मिळाली आहे. अधिकाऱ्यांकडून या प्रकरणातील मोबाईल डेटा, बँक व्यवहार आणि इतर पुराव्यांची सखोल चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











