व्हॉट्सअपद्वारे ‘सेक्स रॅकेट’; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक …

ठाणे: व्हॉट्सअपद्वारे तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्याद्वारे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचापोलिसांनी पर्दाफाश केला. हे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेलाही पोलिसांनी अटक केली.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी (७ ऑक्टोबर) याची माहिती दिली.
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सापळा रचून या महिलेला ताब्यात घेण्यात आले.
व्हॉट्सअपद्वारे सेक्स रॅकेट, पोलिसांनी महिलेला कसं पकडलं?
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये एक महिला देह विक्रयासाठी दोन महिलांना घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाली होती.
याच माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक डी.के. वालगुडे, एन. डी. क्षीरसागर आणि हवालदार व्ही. आर. पाटील आदींच्या पथकाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास थेट हॉटेलवर धाड टाकली.
पोलिसांनी धाड टाकली तेव्हा दोन महिलाही तिथे होत्या. पोलिसांनी या दलाल महिलेला अटक केली. तिच्या विरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.











