
पुणे: पुण्यातील खडकी परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन (Pune News) मुलीवर झालेल्या क्रूर अत्याचाराची घटना समोर आली आहे. आरोपी हा मुलीचा दूरचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. 24 वर्षीय तरुण हा 2021 पासून मुलीवर पुणे आणि कर्नाटकमध्ये वारंवार अत्याचार करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
घडलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलगी ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ आल्याने ससून रुग्णालयातील तपासणीत उघड झाले. ताप आल्यामुळे उपचारासाठी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्त तपासणीत या भयानक गोष्टीचा खुलासा झाला आणि परिसरात खळबळ उडाली.
पीडितेच्या आईने तत्काळ समर्थ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपी अद्याप अटक होणे बाकी आहे. खडकी पोलिसांनी पोक्सो अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
घडलेला अत्याचार लॉजवर झाला होता. आरोपीने फोनवरून मुलीशी जवळीक वाढवली आणि नंतर तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, मुलगी घर सोडून निघून गेली होती, त्यामुळे तिच्या अपहरणाचा प्रकरणही खडकी पोलिसांकडे नोंदवण्यात आले. तिला शोधून काढल्यानंतर तिला मुंढवा येथील महिला आश्रमात ठेवण्यात आले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा कर्नाटक राज्याचा मूळ रहिवासी असून, दूरच्या नात्याचा असल्याचा फायदा घेऊन मुलीवर अत्याचार केला. पोलिस आता उर्वरित तपास करून आरोपीला अटक करण्यासाठी पुढील काम करत आहेत.











