सोनं वितळवलं, गोशाळा अन् गरिबांना दान केलं.!; 10 कोटींच्या सोन्याच्या चोरीचा पर्दाफाश …

तामिळनाडू येथे सुमारे 10 कोटी रुपयांचं सोनं लुटणाऱ्या 18 ते 22 वयोगटातील दोन आरोपींना तब्बल सात राज्यांमध्ये शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी दरोड्याच्या रकमेतून 11 लाख रुपये गोशाळेला आणि गरिबांना दान केल्याचे उघड झाले आहे.
नेमकी काय घटना ?
13 सप्टेंबर रोजी तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये ही घटना घडली. चेन्नईचा रहिवासी गुणवंत हा महेश आणि ड्रायव्हर प्रदीपसह दिंडीगूलहून चेन्नईला जात असताना त्यांच्या कारला आरोपींच्या टोळीने थांबवले. ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बंदुकीचा धाक दाखवत आरोपींनी 10 किलो सोने आणि 3 लाख रुपयांची रोख रक्कम त्यांच्याकडून लुटली.
दरोड्यातील सोने घेऊन हे आरोपी मुंबईत आले. आणि त्यांनी या सोन्यापैकी 3 किलो सोने वितळवले आणि त्यातील अर्धा किलो सोनं मुंबईतील एका सोनाराला देऊन त्याच्याकडून 15 लाख रुपये रोकड घेतली.
मुंबईतून मिळालेल्या या रकमेतून आरोपींनी हरियाणा, मोरेना आणि ग्वालियरसह वेगवेगळ्या ठिकाणी गोशाळेला आणि गरिबांना मिळून 11 लाख रुपये दान केले.
या घटनेनंतर काही दिवसांनी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती, मात्र मांगीलाल कनाराम (22) आणि विक्रम रामनिवास जाट (18) हे दोन आरोपी फरार होते. सात राज्यांमध्ये त्यांचा शोध घेतल्यानंतर अखेर त्यांना मध्य प्रदेशातील बरवानी येथील सेंधवा येथून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 10 कोटी रुपये किमतीचे 9 किलो 424 ग्रॅम सोने आणि इतर साहित्य जप्त केले आहेत.











