‘तुला तमाशात नाचवू’ विधवा महिलेची फसवणून; बनावट लग्न करून शिर्डीला नेलं अन्…

पुणे : पतीच्या मृत्यूनंतर नोकरीच्या शोधात असलेल्या विधवा महिलेची तिच्याच मैत्रिणीने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. काम मिळवून (Pune Crime) देतो असे सांगून आरोपींनी तिला शिर्डीत नेले, तिथे बनावट नावाने तिचे लग्न लावले, सोन्याचे दागिने आणि पैसे हिसकावले.
एवढ्यावरच न थांबता तिच्या (Pune News) दोन लहान मुलांना ओलीस ठेवत 1 लाख 80 हजार रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास तमाशाच्या कार्यक्रमात नाचायला भाग पाडण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पीडिता पुणे शहरात पतीच्या निधनानंतर पाच मुलांच्या जबाबदारीत होती. तिची ओळखीची मैत्रीण निकिता तापमुडे आणि दिपक या दोघांनी “हाऊसकीपिंगचे काम आहे, 10 हजार पगार मिळेल” असे सांगून तिला शिर्डीला नेले. तिथे मंगल अंकुश पठारे हिने लग्न जमवणाऱ्या एजंटशी तिची ओळख करून दिली आणि बनावट आधारकार्ड तयार केले.
काम नाकारल्यावर “तू जर हे काम केले नाही तर तुझ्या मुलांना गुजरातला विकून मारून टाकू” अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले आणि लग्नात मिळालेल्या सोन्याचे दागिने आरोपींनी घेतले. लग्नानंतर काही दिवसांनी आरोपींनी तिला पळून येण्यास सांगितले व तिच्याकडील दागिने घेतले. पुण्यात परतल्यानंतर तिच्या आरोपी पतीनेच तिच्यावर चोरीची खोटी तक्रार दाखल केली, ज्यामुळे तिला एका महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला.
जामिनासाठी 1 लाख 80 हजार रुपये दिल्याचे सांगत मंगल पठारे हिने तिची दोन लहान मुले आपल्या ताब्यात ठेवली. “पैसे परत दिल्याशिवाय मुलांना सोडणार नाही” अशी धमकी देत पीडितेला सोनाली नगरकर ऊर्फ सुनिता हिच्या तमाशा पार्टीत जबरदस्ती नाचायला भाग पाडण्यात आले. तमाशामध्ये अशा अनेक महिलांना काम व लग्नाचे आमिष दाखवून आणले जात असल्याचे पीडितेला कळले.
या सगळ्या प्रकाराला कंटाळून पीडित व तिच्या बहिणीने मंगल अंकुश पठारे आणि सोनाली नगरकर ऊर्फ सुनिता यांच्या विरोधात पुण्यात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पीडितेचा आरोप आहे की तिची दोन लहान मुले अद्याप आरोपींच्या ताब्यात आहेत आणि पैसे न दिल्यास त्यांना विकून मारण्याची धमकी दिली जात आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.











