हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्यांविरोधात गुन्हा दाखल

माहेरहून पैसे आन तसेच हुंड्यात सोन्याचे दागिने आणावेत म्हणून सासरकडील नातेवाइकांनी छळ केल्याने महिलेने रहात्या घरी बेडरुमच्या छताचे हुकास ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गडदेवस्ती नंदेश्वर ता.मंगळवेढा घडली.
महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासु शोभा शिवाजी गडदे, सासरे शिवाजी काशीनाथ गडदे, दिर समाधान शिवाजी गडदे, पती दिपक शिवाजी गडदे सर्व (रा.गडदेवस्ती नंदेश्वर ता.मंगळवेढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मयत ज्ञानेश्वरीचे वडिल किसन सोमा मासाळ (वय 55 रा.मासाळवस्ती गोणेवाडी ता मंगळवेढा) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ज्ञानेश्वरी दिपक गडदे (वय 20) ही मूळची गोनेवाडी गावातील आहे. तिचा गेल्या वर्षी (2024) मे महिन्यात दीपक शिवाजी गडदे याच्याशी विवाह झाला होता.
विवाहात ज्ञानेश्वरीच्या कुटुंंबीयांनी हुंडा व सोने दिले नव्हते, त्यामुळे सासरकडील वरील आरोपी ज्ञानेश्वरीला आई-वडिलांसोबत बोलू देत नव्हते व मानसिक त्रास देत होते.
विवाहानंतर काही महिन्यात पती दीपक, सासू शोभा, दीर समाधान, सासरे शिवाजी यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने दिले नसल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला. तिला टोमणे मारण्यात आले. आरोपींनी माहेरहून पैसे हुंडा घेऊन येण्याची मागणी केली.
छळामुळे ज्ञानेश्वरीने दि.10 सप्टेंबर रोजी राहत्या घरी बेडरुमच्या छताचे हुकास ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी मुलीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद ज्ञानेश्वरीच्या वडिलांनी नुकतीच दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक लातूरकर हे तपास करत आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल करण्यासाठी मयत ज्ञानेश्वरीच्या नातेवाईकांनी सोलापूर येथून शवविच्छेदन करून ज्ञानेश्वरीला थेट पोलीस ठाण्याच्या आवारात ॲम्बुलन्स आणण्यात आली होती.











