देश-विदेश

पाकिस्तानात पाणीबाणी, भर उन्हाळ्यात अनेक भागात महापूर ! इमरजेंसी जाहीर, भारताच्या नावाने बोंबाबोंब …


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहे. दुसरीकडे पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ रणगाड्यांची मोठी कुमक पाठवली आहे. या हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार रद्द करण्याचा भारताच्या निर्णयाने पाकिस्तान हादरला आहे.

तर आता झेलम खवळल्याने पाकिस्तानमधील अनेक भागात पाणीबाणी झाली आहे. प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. भारतावर तिथला मीडिया आगपाखड करत आहे.

मुझफ्फराबादमध्ये आपत्कालीन परिस्थिती

भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडल्याने पाकिस्तानात महापूर आल्याचा दावा तिथला मीडिया करत आहे. झेलम नदीला पूर आल्याने मुझफ्फराबाद परिसरात इमरजेंसी जाहीर करण्यात आली आहे. भारताने पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडल्याने परिसरात पूर आल्याचा ठपका पाकिस्तान प्रशासनाने ठेवला आहे.

पाकिस्तानी मीडियाच्या दाव्यानुसार अचानक पाणी सोडल्याने मुझफ्फराबाद परिसरातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली. हट्टियन बाला भागात पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली. मशि‍दींमधून नागरिकांना बाहेर न पडण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. झेलमचे पाणी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात घुसले आणि पाक व्याप्त काश्मीरमदील चकोठी परिसरात त्याने मोठा हाहाकार उडवला. त्यानंतर पुराने पाकिस्तानमधील अनेक भागांना व्यापले.

सिंधू पाणी करार रद्द करण्याची अधिसूचना

दरम्यान भारताने पाकिस्तानला सिंधू पाणी करार रद्द करण्याची अधिकृत माहिती दिली आहे. याविषयीची औपचारिक अधिसूचना पाकिस्तानला देण्यात आली आहे. गुरुवारी याविषयीचे कागदपत्रे पाकिस्तानला सोपवण्यात आली. पाणी पातळी, पाण्याचा एकूण साठा, पाणी सोडण्याबाबतच्या सूचना, नवीन जलयोजना, त्यासंबंधीच्या बैठका, आकडेवारी वा पाण्याविषयीची कोणतीही माहिती देण्याबाबतचे सर्व नियम, हरकती रद्द करण्यात आल्या आहेत. आता हा करार रद्द केल्याने भारताला नवीन जलयोजना राबवण्यासाठी पाकिस्तानची अनुमती घेण्याची गरज नाही. दरम्यान पाकिस्तानच्या लष्कराने गेल्या दोन दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक केली आहे. या भागात सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे. तर पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ हालचाली वाढल्या आहेत. सीमेवर रणगाडे तैनात करण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button