
पुणे : मुलबाळ होत नसल्याने मित्राला स्वत:च्या पत्नीसोबतच शरीरसंबंध ठेवायला सांगितल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी हा नराधम पती त्याच्या मित्राला घरीही घेऊन आला, यानंतर पतीच्या मित्राने महिलेकडे एकटक बघत महिलेचा विनयभंग केला.
तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवून मुलबाळ करून दे, असं तुझा पती सांगत असल्याचे मेसेजही पतीचा मित्र पीडित महिलेला करत होता, तसंच तिला फोन करूनही त्रास देत होता.
पतीच्या मित्राकडून वारंवार अश्लिल कृत्य केलं जात असल्यामुळे 25 वर्षांच्या या महिलेने खडक पोलीस स्टेशनला धाव घेतली. यानंतर पोलिसांनी महिलेचा 30 वर्षीय पती आणि त्याचा 50 वर्षाच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 21 जुलै 2023 ते 2 मार्च 2025 पर्यंत पतीच्या मित्राकडून महिलेला अशापद्धतीने त्रास दिला जात होता.
पती आपल्याला शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचा आरोपही पत्नीने तक्रारीमध्ये केला आहे. पत्नीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी एकदिवस पती त्याच्या मित्राला घरी घेऊन आला, यानंतर तो महिलेकडे एकटक पाहायला लागला आणि तिचा विनयभंग केला. पतीच्या मित्राने एकांताचा फायदा घ्यायचाही प्रयत्न केला, पण याला महिलेने विरोध केला, असं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
महिलेच्या विरोधानंतरही पतीचा मित्र महिलेला सतत अश्लिल मेसेज आणि फोन करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तुझा नवरा तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवू शकत नाही, त्यामुळे त्याने मला तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवून मुलबाळ करून द्यायला सांगितलं आहे, असे मेसेज पतीचा मित्र महिलेला करत होता. सततच्या या जाचाला कंटाळून महिलेने पोलीस स्टेशन गाठलं आणि पती तसंच पतीच्या मित्राविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.