मोठी बातमी! ‘हे’ महत्त्वाचे बिल लोकसभेत मंजूर; पाक- बांगलादेशसोबत भारताच्या शत्रूंचे टेन्शन वाढले

लोकसभेत आज ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल- २०२५’ मंजूर झाले. ज्यामध्ये इमिग्रेशनचे नियमन करण्यासाठी आणि भारतात रहणाऱ्या परदेशी लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास मंजूरी मिळाली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने ११ मार्चला हे विधेयक मांडले होते. त्यात इमिग्रेशन नियंत्रित करणारे चार विद्यमान कायदे बदलून सोपे व मजबूत कायदे करण्याचे सूचवले होते. ते बील आज मंजूर करण्यात आले.
काय म्हणाले अमित शहा?
लोकसभेत स्थलांतर आणि परदेशी विधेयक मंजूर करताना अमित शहा यांनी जोरदार बाजू मांडली. ते म्हणाले की, देश धर्मशाळा नाही. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना देशात प्रवेश दिला जाणार नाही. जर कोणी देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी देशात येत असेल तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे. मात्र इतरांवर लक्ष्य ठेवले जाईल,” असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी एएनआयला सांगितले.
नेमका काय बदल होईल?
या कायद्यामुळे केंद्राला कोणत्याही परदेशी व्यक्तीची वारंवार ये-जा असलेल्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळतो. मालकाला परिसर बंद करण्याची, विशिष्ट परिस्थितीत त्याचा वापर करण्याची परवानगी देण्याची किंवा सर्व किंवा “विशिष्ट वर्गातील” परदेशी नागरिकांना प्रवेश नाकारण्याची परवानगी मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सांगितले की, पर्यटक म्हणून किंवा शिक्षण, आरोग्यसेवा आणि व्यवसायासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्यांचे स्वागत करण्यास सरकार तयार आहे.
परंतु ज्यांनी धोका निर्माण केला आहे त्यांच्यावर गंभीर कारवाई केली जाईल. कनिष्ठ सभागृहाने मंजूर केलेल्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५ लोकसभेत आल्यावर त्या चर्चेत भाग घेताना त्यांनी हे विधान केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केवळ वाईट हेतू असलेल्या लोकांनाच भारतात येण्यापासून रोखेल, असे शहा यांनी स्पष्ट केले.