सारखी माहेरी जायची पत्नी, संशय आल्यावर मागोमाग आला पती, समोरचं दृश्य पाहून हादरला …

मेरठमधील मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने केलेल्या पती सौरभ राजपूतच्या निर्घृण हत्येने देश हादरला आहे. मेरठमधल्या या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, पण या सुदैवाने पतीचा जीव वाचला आहे.
ग्वालियरच्या झाशी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रबनी नाका येथे अनिल पाल यांना एका कारने धडक दिली. धडक दिल्यानंतर अनिल पाल यांना या कारने काही मीटर फरफटत नेलं आणि त्यानंतर कारचा ड्रायव्हर तिथून फरार झाला. यानंतर जखमी अवस्थेमध्येच अनिलने पोलीस स्टेशन गाठले आणि पत्नी रजनी आणि तिचा प्रियकर मंगल सिंग याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
20 मार्चला आपण पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडलं, यानंतर आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण प्रियकर गाडी घेऊन तिथून निघून गेला, असं अनिलने सांगितलं आहे. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे, ज्यामध्ये आरोपी अनिलला फरफटत घेऊन जाताना दिसत आहे. 8 वर्षांपूर्वी अनिलचं लग्न ग्वालियरच्या टेकनपूरयेथील रजनीसोबत झाले होते.
लग्न झाल्यापासून पत्नी आपल्याला मारहाण करायची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी द्यायची. समाज आणि मुलांच्या नावाखाली आपण सगळं सहन करत होतो, रजनीचे तिच्या प्रियकरासोबत 12 वर्षांपासूनचे संबंध होते, असा आरोप अनिलने केला आहे.
रजनी कोणत्या ना कोणत्या कारणाने टेकनापूर येथील तिच्या माहेरी जात असे, त्यामुळे अनिलला संशय आला आणि तोही रजनीच्या मागे तिच्या माहेरी आला. अनिलने रजनीला तिचा प्रियकर मंगलच्या गाडीतून खाली उतरताना पाहिलं आणि त्याने दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मंगलने गाडीने अनिलला धडक दिली आणि त्याला फरफटत घेऊन गेला. मंगल हा भाजीपाला व्यापारी आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 मार्चला रजनी घरातून 2 लाख रुपये आणि सोन्याचा हार घेऊन कुणालाही न सांगता मंगलसोबत निघून गेली, असंही अनिल म्हणाला आहे. मला यापुढे रजनीला घरात ठेवायचं नाही. मी 181 या हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली. यानंतर 5 दिवसांनी म्हणजेच 25 मार्चला रजनी तिच्या प्रियकरासोबत परत आली आणि घराबाहेर बसली. तिने मला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. मंगलवर कारवाई झाली तर तुझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल करेन, अशी धमकी रजनीने दिल्याचा आरोप अनिलने केला आहे. दरम्यान याप्रकरणात अपघाताची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सीएसपी रॉबिन जैन यांनी दिली आहे. तसंच याप्रकरणात सगळ्यांचे जबाब नोंदवून योग्य ती कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.