महंत नामदेवशास्त्रींचा धनुभाऊंना जाहीर पाठिंबा; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया ….
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत.
दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
भगवान गड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावेसे वाटते की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवले नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेत आहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाही. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाही ना, असे सांगत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.
भगवान गडाने धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्याबाबत पंकजा मुंडेंना काय वाटते?
भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी मांडलेल्या भूमिकेवर पंकजा मुंडे यांनी अधिक भाष्य केले नाही. त्यांची त्यांची भूमिका आहे, त्यावर मी भूमिका व्यक्त करण्याची आवश्यकता वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः विषय अजून तसा धनंजय मुंडे यांच्याकडे केला नाही. त्यामुळे मला कळत नाही, कुठे दबाव आहे. स्वतः अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेले आहे, त्यात संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू. पण, संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, हा अजितदादांचा निर्णय आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मृत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर जाणार असून, सर्व पुरावे नामदेवशास्त्री यांना देणार आहेत. यावर बोलताना, प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्याने फक्त बातमी होते, बाकी काही नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तर, त्यांचे ते व्यक्त होतात, मी त्यांच्यावर कधी व्यक्त होत नाही, ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, तसेच ते दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत, असे सांगत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलेल्या विधानावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.