नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावरून वादळ, अखेर पंकजा मुंडे धनुभाऊंच्या प्रश्नावर बोलल्या…
जालना : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडचं राजकारण ढवळून निघालं आहे. भगवनगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंबद्दल वक्तव्य केल्यानंतर एकच वादळ उठलं होतं. या प्रकरणावर आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तपास यंत्रणा जो काही पुरावा देईल, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेईल. यावर सगळं अवलंबून आहे. जर धनंजय मुंडे दोषी नसतील तर अन्याय व्हायला नको, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे, त्यामुळे त्यावर सगळं अवलंबून आहे, असं म्हणत पंकजांनी सावध प्रतिक्रिया दिली. पण नामदेव शास्त्रींच्या विधानावर मात्र बोलण्याचं टाळलं. .
आज जालन्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराण केल्याच्या मुद्दावर प्रतिक्रिया दिली.
“धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नाही. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच्यामध्ये काही संबंध आढळला तर कारवाई करू. पण जर काही संबंध आढळला नाहीतर अन्याय नको. अशी त्यांची भूमिका आहे. याबद्दल सर्वसर्वी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. तपास यंत्रणा जो काही पुरावा देईल, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेईल. यावर सगळं अवलंबून आहे. मुळात सगळया गोष्टी तपास यंत्रणांवर अवलंबून आहे, असं सांगत या प्रकरणात संबंध आढळून आल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
“संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचं नामदेव शास्त्री यांनी जाहीर केलं आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी काही सांगायचं कारण नाही. मी काही प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही. आता नामदेव शास्त्री यांनी काय म्हटलं, ते मी ऐकलं नाही. ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यावर मी व्यक्त व्हावं अशी काही आवश्यकता नाही. सर्वसर्वी त्यांची भूमिका आहे. प्रत्येक व्यक्तींच्या विधानावर व्यक्त होणं ही फक्त बातमी होते, बाकी काही होत नाही.
आता धनंजय मुंडे यांचं नामदेव शास्त्री यांनी समर्थन केलं यावर प्रतिक्रिया देणं मला आवश्यक वाटत नाही, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.