क्राईम

अनैतिक संबंधातून आईनेच प्रियकरासोबत रचला होता मुलाच्या खुनाचा कट; दारू पाजून डोके दगडाने ठेचले


कऱ्हाड : अनैतिक संबंधातून (Love Relationship) आईनेच प्रियकरासोबत मुलाच्या खुनाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दरम्‍यान, पोलिसांच्या तत्परतेने मुलाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. संबंधित घटनेतील संशयितांना चोवीस तासांच्या आत पोलिसांनी जेरबंद केले.

 

पोलिसांनी (Karad Police) दिलेली माहिती अशी, वराडेचे पोलिस पाटील यांनी गावच्‍या हद्दीत २९ जानेवारीला एक अनोळखी इसम गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली. या माहितीवरून तळबीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. जखमीच्या डोक्यात व डोळ्यास गंभीर जखमा झाल्याचे निदर्शनास आले.

 

तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमीला पुढील उपचारासाठी साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, त्‍याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक्स सायन्सची टीम व डॉग स्कॉड पाचारण केले.

 

वेगवेगळ्या पथकांद्वारे तपासाची चक्रे फिरवली. अनोळखी जखमीची पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे ओळख पटविली. संबंधिताचे नाव प्रशांत महादेव शेंडगे (वय २४, रा. शिवडे, ता. कऱ्हाड) असल्याचे निष्पन्न झाले. घटनेबाबत पोलिसांनी अधिक माहिती मिळविल्यावर जखमीचा भाऊ व आई हे पुणे येथे राहण्यास असल्याचे समजले. घटनास्थळी मिळालेल्या दुव्यांवरून पोलिसांनी तपास पथके रवाना केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला. त्यात संशयित जयेंद्र गोरख जावळे (वय ४०, मूळ रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, सांगवी ता. हवेली) याचे व जखमीची आई शोभा महादेव शेंडगे (वय ३८, रा. काटेपुरम चौक) यांचे अनैतिक संबंध होते.

शोभाचे माहेर शिवडे असून, त्याठिकाणीच ती तिच्या मुलांसह राहण्यास आहे. यातील जखमी हा व्यसनाधीन होऊन शोभाला त्रास देत होता. या कारणावरून जयेंद्र जावळे व शोभा शेंडगे यांनी जयेंद्रचे दोन साथीदार सिद्धार्थ विलास वाव्हळे (वय २५, मूळ रा. मातोश्रीनगर, वांगी रोड, परभणी, सध्या रा. राजयोग गार्डन, वाकड चौक) व अकबर मेहबूब शेख (वय २५, रा. निकाळजे वस्ती, बाणेर गाव) यांच्यासह प्रशांत शेंडगे यास जिवे मारण्याचा कट रचल्‍याचे निष्पन्न झाले.

त्याप्रमाणे संशयिताने पुणे येथून रिक्षाने येऊन प्रशांतला उंब्रज येथून वराडे येथील शेतात नेले. त्यास दारू पाजून त्याचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथील स्थानिक नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे जखमीवर कृष्णा हॉस्पिटल येथे तत्काळ उपचार झाल्याने तो बचावला. पोलिसांनी हा गुन्हा तत्काळ उघडकीस आणून गुन्ह्यातील निष्पन्न संशयितांना चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button