रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार? मुंबईत एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट !
विधानसभा निवडणुकीत पराजय झाल्यापासून रवींद्र धंगेकर पक्षावर काहीसे नाराज आहेत. गुरुवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेणार का?
अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे झुंजार नेते. मनसेमधून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघ बांधला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक लागलेल्या कसब्यात त्यांनी भाजपला अस्मान दाखवून विधानसभेत पाऊल ठेवले. केवळ दीड वर्षे काम करायला मिळाल्यानंतर ते पुन्हा २०२४ च्या विधानसभेला सामोरे गेले. परंतु यंदा विजयाची पुनरावृत्ती झाली नाही. भाजपच्या हेमंत रासने यांनी बाजी मारून धंगेकर यांना पराभूत केले आणि मागील पराजयाचा बदलाही घेतला. विधानसभेतील पराजयापासून धंगेकर पक्षात काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे.
रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी शासकीय निवासस्थानी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास भेट झाल्याची माहिती आहे. सध्याच्या घडामोडींच्या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली. चर्चेनंतर बाहेर पडताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.
रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेण्यामागे काय कारण असावे? त्यांच्या मनात काँग्रेस सोडून शिवसेनेत जाण्याविषय द्वंद्व सुरू आहे का? की आणखी कोणत्या विषयासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असे प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार आमच्या गळाला लागणार आहेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले होते. त्यांच्या दाव्यानुसार धंगेकर हे त्यातीलच एक माजी काँग्रेस आमदार असावेत का? असेही विचारले जात आहे.
कोण आहेत रविंद्र धंगेकर?
-रवींद्र धंगकर हे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आहेत
-२०२४ विधानसभेला हेमंत रासने यांच्याकडून त्यांचा पराभव झाला
-तसेच २०२४ सालीच झालेल्या लोकसभेलाही मोहोळ यांनी त्यांना चितपट केले
-सलग दोन वेळा पराजय झाल्याने पक्ष निवडणूक कामात कमी पडल्याची त्यांच्या मनात भावना असल्याचे कळते
-तत्पू्र्वी रवींद्र धंगेकर यांनी चार वेळचे पुणे महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिले
-आधी ते शिवसेनेत होते, नंतर मनसेत आणि नंतर काँग्रेस… असा त्यांचा प्रवास