मोठी बातमी! ”राजीनामा द्यायला तयार पण…” धनंजय मुंडेंनी दिल्लीत स्पष्टच सांगितलं
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगेलच ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची तोफ डागली जात आहे.
धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे दिल्लीत दाखल झालेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
धनंजय मुंडे आज पहाटेच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय हा दिल्लीत होणार का, याची चर्चा सुरू झाली होती. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेत विविध मुद्यांवर चर्चा केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांना मकोका अंतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. कराड यांना या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात शरणागतीनंतर अटक करण्यात आली होती. त्याशिवाय, देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कराड यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांना विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संतोष देशमुख हत्येला 51 दिवस…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 51 दिवस झाले. याबाबत बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले की, ही घटना दुर्देवी आहे. या घटनेच्या 51 दिवसांमध्ये पहिल्या दिवसांपासून मी एकच गोष्ट बोललो आहे. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मी सातत्याने केली असल्याचे मुंडे यांनी म्हटले.
राजीनामा देण्यास तयार, पण…
धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य केले. धनंजय मुंडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. माझ्या राजीनाम्यामुळे सगळ्या गोष्टी सुटणार असतील तर राजीनामा देईल. माझा दोष वरिष्ठांनी सांगावा. माझी नैतिकता लोकांबद्दल प्रामाणिक आहे, मी आतापर्यंत प्रामाणिक भूमिका मांडली असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत मला टार्गेट करण्यात आले असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.