नातवंडांना खेळवण्याचं वय पण आजी पळाली 30 वर्षांच्या बॉयफ्रेंडसोबत, हा ठरला दुसरा प्रियकर!
कानपूर : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. कारण प्रेमाला अजोड अशा नात्याची उपमा देण्यात आलेली आहे. कलियुगात मात्र प्रेमाला कसलेच धरबंध राहिलेले नाहीत, अशी उदाहरणं वेळोवेळी दिसून येतात.
एखादी मध्यमवयीन व्यक्ती आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीशी लग्न करते किंवा तरुण मुलांचं आपल्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांवर प्रेम जडतं, असे अनेक प्रकार घडत असतात. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. तिथे एक ज्येष्ठ महिला तीस वर्षांच्या पुरुषासोबत पळून गेली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कानपूरमध्ये बजरिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली. पी. रोडजवळ गावात राहणारं एक कुटुंब आहे. हे कुटुंब फुलांचा व्यापार करतं. त्यांचं घर माणसांनी भरलेलं आहे. पती-पत्नी, त्यांची तीन मुलं आणि आई असा तो परिवार आहे. तीन मुलांपैकी एका मुलाचं लग्न झालं असून, त्याला एक मुलगाही आहे. त्यामुळे या फूलव्यापाऱ्याची पत्नी आजी झाली आहे. ही आजी नुकतीच 30 वर्षांच्या एका पुरुषासोबत पळून गेली आहे. त्यामुळे कुटुंबीयांची नाचक्की झाली आहे. याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती महिला अशा प्रकारे पळून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. आठ वर्षांपूर्वीही ती एका तरुणासोबत पळून गेली होती; मात्र त्यानंतर ती परत आली होती. या वेळी मात्र ती अद्याप परत आलेली नाही. कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बजरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणाले, की ‘या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली आहे. ती महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्या दोघांचा तपास लावला जाईल. या प्रकरणी अधिक कारवाई सुरू आहे.’
त्या महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं, की तिने कुटुंबीयांची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. तिला लवकर शोधून काढावं आणि तिच्यावर कारवाई करावी.
त्या महिलेच्या मुलाने सांगितलं, की ती घरातून पळून जाण्याची ही दुसरी वेळ आहे. या वेळी ती 30 वर्षांच्या मुलासह पळून गेली आहे. ती कुटुंबाच्या बाबतीत जराही विचार करत नाही. तिच्या पतीलाही ती मारहाण करते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन संपूर्ण माहिती दिली आहे.