पुणे : दोन दिवसांपूर्वी रहायला आलेल्या महिलेचा खुन; पती फरार
पुणे : दोन दिवसांपूर्वी रहायला आलेल्या महिलेच्या डोक्यात मारुन तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्याबरोबर असलेला पती फरार झाला असून खुनामागील कारण अद्याप समजू शकले नाही.
भवानी पुनेंदु मंडल (वय २२, रा. नथ्थु लांडगे चाळ, छत्रपती शिवाजी चौक, कासारवाडी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती पुनेंदु मंडल (वय अंदाजे ३२, रा. ओडिशा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता उघडकीस आली आहे. याबाबत संतोष नथु लांडगे (वय ४८, रा. नथु लांडगे चाळ, शिवाजी चौक, कासारवाडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात (Dapodi Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी आणि पुनेंदु मंडल हे गेल्या मंगळवारी कासारवाडी येथील नथ्थु लांडगे चाळीत रहायला आले. मुळचे ओडिशाचे राहणारे मंडल हे दोघेही बिगारी काम करायचे. भवानी हिने एकाकडून घरासाठी डिपॉझिट देण्यासाठी पाचशे रुपये घेतले होते. दोन दिवसांनी परत देते, असे सांगितले होते. ते पैसे घेण्यासाठी तो लांडगे चाळीत आला. घरमालकाला त्याने भवानी कोठे राहते म्हणून विचारले. तेव्हा त्यांनी चाळीतील खोली दाखविली. खोलीचा दरवाजा नुसता लोटलेला होता. घरमालकाने आवाज दिल्यावर कोणी उत्तर न दिल्याने त्यांनी दरवाजा ढकलला. तेव्हा खोलीमध्ये भवानी निपचित पडून होती. काहीतरी वेगळा प्रकार असल्याचे पाहून त्यांनी पोलिसांना कळविले.
दापोडी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल. तेव्हा भवानी हिच्या तोंडावर व डोक्यात मारुन तिचा खुन केला होता. ही घटना खूप अगोदर झाली असावी, असे तिच्या मृतदेहाजवळ लागलेल्या मुंग्यावरुन दिसून येत होती. तिचा पती पुनेंदु मंडल हा तेव्हापासून मोबाईल बंद करुन फरार झाला आहे. दोघेही या खोलीत रहायला आले. त्या मंगळवारीच कोणीतरी किंवा तिच्या पतीने भवानी हिला मारले असावे, असा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे तपास करीत आहेत.