मोठी बातमी ! शरद पवारांची प्रकृती खालावली
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यात असून त्यांची प्रकृती खालावली आहे. शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मात्र त्यांना नेमका काय त्रास होतोय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.
समोर आलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे, त्यांना अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आपले पुढच्या चार दिवसांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, अजित पवार यांनी उठाव केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि दुसरा राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं नाव देखील अजित पवार यांना मिळालं. शरद पवार यांना तुतारी हे नवं चिन्ह मिळालं. मात्र नव्या चिन्हावर निवडणूक लढवून देखील शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महायुतीला मोठा धक्का दिला होता. खुद्द बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तर सुप्रिया सुळे या विजयी झाल्या.
मात्र लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुतीच्या 232 जागा निवडून आल्या. 131 जागांसह भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला, महाविकास आघाडीतील तीन पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. सर्वात कमी जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाल्या, राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 10 जागांवरच समाधान मानावं लागलं. मात्र त्यानंतर देखील शरद पवार यांनी हार मानली नाही, त्यांनी पुन्हा एकदा राज्यभरात दौऱ्याला सुरुवात केली. महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. आताही त्यांचे दौरे सुरूच आहेत, मात्र त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढच्या चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.