आयटीनगरीत काँक्रिट मिक्सर पलटल्याने दोन तरुणींचा चिरडून दुर्दैवी अंत

हिंजवडी : भरधाव वेगाने आलेल्या काँक्रिट मिक्सर गाडी चालकाचे हिंजवडीतील वडजाईनगर वळणावर नियंत्रण सुटल्याने काँक्रिटने भरलेला मिक्सर माण म्हाळुंगे रस्त्याला पलटी झाला. तिथून दुचाकीने जात असलेल्या दोन तरुणींचा मिक्सरखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला.
मिक्सर काँक्रिटने गच्च भरला असल्याने या तरुणींचा चेंदामेंदा झाला होता. त््यांची ओळख पटणे देखील अवघड झाले आहे.
तशीच अवस्था त्यांच्या दुचाकीची झाली आहे. हा मिक्सर इतका वजनदार होता की त्याला हटविण्यासाठी चार क्रेन लावाव्या लागल्या
हा भीषण अपघात शुक्रवारी ( दि 24 )सायंकाळी सव्वाचार वाजता जी वन मार्केट समोर झाला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशामक दल, गुन्हे शाखेचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले.
गाडीत पूर्ण रेडिमिक्स कॉक्रीट असल्याने पलटी झालेला डंपर बाजूला करणे चार चार क्रेनला ही अवघड झाले होते. दरम्यान रस्त्यावर चार चार किलोमीटर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह औंध जिल्हा रुग्णालयात पाठविले असून उशिरापर्यंत मृत तरुणींची ओळख पटलेली नव्हती.
दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेय्या थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेत वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणी म्हाळुंगेकडून आल्या होत्या. त्यांची कुठलीही चूक नसताना या निष्पाप मुलींना आपला जीव गमवावा लागला. त्या आयटी अथवा इतर कुठल्यातरी कंपनीत काम करणाऱ्या तरुणी असाव्यात अशी शक्यता प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केली आहे.