आजीची मोहन माळ विकली, मैत्रिणीसोबत पुण्यात ऐश केली, कांड समजताच बाप ठरला सव्वाशेर!
पुणे : इन्स्टाग्रामवर भेटलेल्या 24 वर्षांच्या मुलीवर पैसे उडवून तिला इम्प्रेस करण्यासाठी अल्पवयीन मुलाने आजीची मोहन माळ विकली आहे, पुण्यामध्ये हा प्रकार घडला आहे. मुलगा घरातून गायब झाल्यामुळे वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पण मैत्रिणीसाठी मुलाने घरातली मोहन माळ विकल्याचं कुटुंबाच्या लक्षात आलं आणि त्यांना धक्काच बसला.
मुलाने घरात चोरी केल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबाचा संताप अनावर झाला आणि त्यांनी मुलाला घरामध्ये न घ्यायचा निर्णय घेतला, त्यामुळे पोलिसांनी त्याला देखरेखीखाली ठेवलं. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या 24 वर्षांच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 24 वर्षांची ही मुलगी पुण्याच्या धनकवडी परिसरात राहते.
ब्रेकअपनंतर मुलासोबत मैत्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाचं कुटुंब पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक गावात राहतं. मुलाचे वडील पीएमपीएमएलमध्ये कंडक्टर म्हणून काम करतात. 9वी मध्ये शिकणाऱ्या या मुलाची इन्स्टाग्रामवर 24 वर्षांच्या तरुणीसोबत मैत्री झाली. ही तरुणी टॅटू आर्टिस्ट म्हणून काम करते. बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तरुणी इन्स्टाग्रामवर नव्या मित्राच्या शोधात होती, तेव्हा तिला हा अल्पवयीन मुलगा सापडला.
इन्स्टाग्रामवर काही काळ बोलणं झाल्यानंतर दोघांनीही भेटायचं ठरवलं. तरुणीला भेटायला जाताना तिला इम्प्रेस करण्यासाठी मुलाने आजीची मोहन माळ घेतली आणि ती 1.30 लाख रुपयांना विकली. यानंतर दोघांनीही ही रक्कम अर्धी अर्धी करून स्वत:च्या बँक अकाऊंटमध्ये टाकली. यानंतर दोघंही फर्ग्युसन कॉलेजच्या रोडवर फिरत होते.
मुलाचा ताबा घ्यायला वडिलांचा नकार
दुसरीकडे मुलगा सापडत नसल्यामुळे वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनीही लगेचच तपासाची चक्र फिरवली, त्यामुळे मुलगा आणि तरुणी सापडले. यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतलं. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळापुढे सादर केलं, पण तिकडे वडिलांनी मुलाचा ताबा घ्यायला नकार दिला, त्यामुळे मुलाला बाल सुधार गृहात पाठवलं गेलं.
बाल सुधार गृहातल्या मुलांच्या संपर्कात फार काळ आल्यावर तुमच्या मुलाच्या मनावर विपरित परिणाम होऊ शकतो, त्यामुळे मुलाचा ताबा घ्या, अशी विनंती पोलिसांनी मुलाच्या वडिलांना केली. तसंच मुलाला समुपदेशकाकडे नेण्याचा सल्लाही पोलिसांनी वडिलांना दिला आहे.