मित्राची निर्घृण हत्या,मित्राची बायको घेऊन पळून गेला, अखेर पोलिसांना सापडला, पण
दिल्ली पोलिसांना एका हत्या प्रकरणातल्या आरोपीला पकडण्यात 25 वर्षांनंतर यश आलं. एका व्यक्तीचे त्याच्या मित्राच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. त्यातून त्याने मित्राची हत्या केली आणि त्याच्या पत्नीसह फरार झाला.
25 वर्षं ही व्यक्ती पोलिसांना गुंगारा देत होती. अखेरीस तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
दिल्ली पोलिसांनी 25 वर्षांनंतर हत्या प्रकरणातल्या एका आरोपीला अटक केली. अजय कुमार दहिया (वय 59) असं आरोपीचं नाव आहे. अजयने 2000मध्ये त्याच्या मित्राची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर अजय मित्राच्या पत्नीला घेऊन पळून गेला. त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. दहिया फरार होता. घटनेनंतर तो पंचकुला इथे गेला आणि त्याने विवाह केला. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो 25 वर्षांत अनेक वेळा कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी गेला. त्याने अनेकदा त्याची ओळखदेखील बदलली. या आठवड्यात तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
मंगळवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी दहियाला हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवरील काला अंब परिसरातून अटक केली. तो तिथं चहा विक्री करत होता. डीसीपी (गुन्हे शाखा) सतीश कुमार यांनी सांगितलं, की ‘गुन्हे शाखेच्या एका पथकाने दहियाला अटक केली. तो दोन दशकांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. कृष्णा सेठी नावाच्या महिलेनं 1 जुलै 2000 रोजी तिची सून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.’
‘तिच्या सुनेचे अजयकुमार दहिया नावाच्या व्यक्तीशी संबंध आहे आणि त्या दोघांनी मिळून तिचा मुलगा अश्वनी सेठीची हत्या केल्याचा संशय कृष्णा सेठीला होता. त्यानंतर अश्वनीचा मृतदेह हरियाणातील झज्जरमधल्या दहियातल्या बिरधाना गावात सापडला. अश्वनीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दहियाने अश्वनीला त्याच्या गावाला बोलावले आणि गोळी झाडून हत्या केली,’ असं सतीश कुमार यांनी सांगितलं. आरोपी आणि मृत व्यक्ती दोघं मित्र होते.
डीसीपींनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं, की ‘पीडित व्यक्ती दहियाची रिक्षा चालवत होती. त्यामुळे त्या दोघांची घनिष्ठ मैत्री झाली. त्यानंतर दहिया अश्वनीची पत्नी सरोज हिच्या प्रेमात पडला. अश्वनीला याबाबत संशय आला. त्यामुळे दहियाने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. दहिया आणि सरोज या आधी हिमाचल प्रदेशातल्या बद्दी इथे लपून बसले होते. तिथं त्यांनी मजुरी काम सुरू केलं. दहिया आणि सरोजमध्ये रोज वाद होत होते. त्यामुळे त्याने तिला पाच ते सहा महिन्यांत सोडून दिलं.’