नवरी जोमात, नवरा कोमात! बँड-बाजा, वरात घेऊन दारात पाहिली वाट, पण ‘तिने’ दाखवला ठेंगा अन…
दुबईत काम करणाऱ्या २४ वर्षीय दीपकला इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मुलीशी लग्न करण्याचा विचार महागात पडला आहे. दीपक बँड, बाजा आणि लग्नाची वरात घेऊन पंजाबमधील मोंगा येथे पोहोचला, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याला धक्काच बसला.
तो ज्या वधूसोबत लग्न करण्यासाठी आला होता ती बेपत्ता होती. आता नवरदेवाच्या कुटुंबीयांनी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
दीपकने सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका मुलीला भेटला होता. तिने मनप्रीत कौर असं तिचं नाव सांगितलं. दोघेही जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पालक फोनवर एकमेकांशी बोलत होते. ६ डिसेंबर २०२४ ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर दीडशे पाहुण्यांची वरात घेऊन दीपक मनप्रीतने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला.
मोगा येथे पोहोचल्यानंतर त्याला कळालं की मुलीने सांगितलेलं ठिकाण प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दीपकने मनप्रीतला अनेकवेळा फोन केला. सुरुवातीला तिने फोन उचलला आणि सांगितलं की, लग्नाची वरात हॉलमध्ये घेऊन जाण्यासाठी तिचे काही नातेवाईक येतील. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणीही आलं नाही. नवरीचा फोनही बंद होता. पाच तासांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात गेले.
दीपकने तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, तो दुबईत राहतो. तीन वर्षांपूर्वी मनप्रीत कौरसोबत इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू केलं आणि शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांशीही फोनवर बोलणे झालं, त्यानंतर ६ डिसेंबरला लग्न ठरलं. मनप्रीतने ती फिरोजपूरमधील एक चांगली वकील असल्याचं सांगितलं होतं. दीपकने पोलिसांना सांगितले की, मी तिला कधीही वैयक्तिकरित्या भेटलो नाही, पण तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पाहिले आहेत. आता मला शंका आहे की, ते फोटो खरे आहेत की नाही.
नवरदेवाने सांगितलं की, त्याने मनप्रीतला ५०००० रुपये देखील ट्रान्सफर केले होते. लग्नाच्या खर्चात मदत म्हणून तिने हे पैसे मागितले होते. नवरदेवाचे वडील प्रेम चंद यांनी सांगितलं की, त्यांनी वधूच्या आईशी फोनवर बोलून लग्न निश्चित केलं होतं, परंतु ते तिच्या कुटुंबातील कोणालाही प्रत्यक्ष भेटले नाहीत. आमची फसवणूक झाली आहे. आम्ही १५० पाहुणे आणि वरात घेऊन आलो होतो. लग्नासाठी बराच पैसा खर्च केला आहे. आम्हाला न्याय हवा आहे.