महायुतीच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला?, भाजपकडे असणार तब्बल इतकी प्रमुख खाती? गृहमंत्रिपद जाणार कोणाकडे?
महायुती सरकारचा मुंबईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे.
अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शपथविधी पार पडत आहे. मात्र त्याआधीही महायुतीतील तिन्ही घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची पुन्हा बैठक झाल्यानंतर ५ कोणाला किती मंत्रिपद आणि कोणती प्रमुख खाती द्यायची याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यावेळी शपथ घेणार असून भाजप तब्बल २२ मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
मागच्या सरकारच्या कार्यकाळातही भाजपने गृहमंत्रिपद आपल्याकडे ठेवलं होतं. यावेळीही गृहमंत्रिपद भाजपकडे राहण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद देखील भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिपद आणि महत्त्वाच्या खात्यांवर चर्च होणार आहे. एकनाथ शिंदे गटाचे ११ ते १२ मंत्री पहिल्या दिवशी शपथ घेतली तर अजित पवार गटाचे १० मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचा निकाल आल्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच शिंदे गटाने १६ मंत्रिपदाची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. नव्या सरकारमध्ये गृह आणि महसूल खातं आणि अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतीपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाके पूर्वीच अर्थमंत्रिपद, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात दिल्ली एकाच दिवशी ४ हाय व्होल्टेज बैठका झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे नव्हते. आता शपथ विधी आधी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे. दरम्यान काळजीवाहू एकनाथ शिंदे हे सध्या आजारी असल्यामुळे महायुतीच्या अनेक बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. शपथविधी आधी होणारी बैठक होणार की नाही याबाबतही शंका आहे.
निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले आहेत. तरी मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. महायुतीत मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाण्याची शक्यता असून या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवार यांचा पाठिंबा आहे. मात्र त्यांचं नाव अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेलं नाही. महायुतीत भाजपने १३२ जागा जिंकत इतिहस घडवला. शिंदे गटाने ५७ जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवार गटाने ४१ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप यावेळी मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार हे मात्र निश्चित आहे. तरम्यान मुंबईच्या आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित हारणार आहेत. यानंतर १६ डिसेंबर रोजी नागपुरात विधानसभेचं हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. मात्र आता कोणाला किती मंत्रिपद मिळतात, कोण मुख्यमंत्री होणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे.